बीड दि. ५ (प्रतिनिधी ) : बीडमध्ये महसूल विभागाच्या डोळ्यादेखत चालणाऱ्या बेकायदा मुरूम उपशावर अखेर पोलीस विभागाने कारवाई केली आहे. महसूल विभागाचा वरदहस्त असल्याने बिनदिक्कतपणे मुरूम उपसा सुरु असलेल्या इमाम्पूरच्या डोंगरावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे बाळराजे दराडे यांनी कारवाई करित मुरूम वाहतूक करणाऱ्या तीन हायवा आणि एक पोकलेन मशीन जप्त केल्याने खळबळ माजली आहे.
बीड शहरालगत असलेल्या इमामपूरच्या डोंगरावर मागच्या काही काळात सातत्याने मुरूम उपसा होत आहे. यासंदर्भाने माध्यमांनी अनेकदा वृत्त प्रकाशित केल्यानंतरही महसूल विभागला यासंदर्भाने जाग आलेली नव्हती. किंबहुना महसूल विभागातील मंडळ अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत हे सारे प्रकार सुरु होते. महसूलच्या लोकांचाच आशीर्वाद असल्याने या मुरुमचॊरीवर कारवाई करायची कोणी हा प्रश्न होताच.
आता अखेर या मुरूम चोरीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील पोलीस अधिकारी बाळराजे दराडे आणि त्यांच्या पथकाने मंगळवारी मोठी कारवाई करीत चोरीच्या मुरुमाची वाहतूक करणाऱ्या तीन हायवे आणि मुरूम उपसा करणाऱ्या पोकलेन मशीन जप्त केल्या आहेत. या प्रकरणात जप्तीची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु आहे. या कारवाईने आता गौणखनिज माफियांमध्ये खळबळ माजली आहे.
जिल्हाधिकारी करणार का कारवाई ?
बीड जिल्ह्यात गौण खनिजाची चोरी हा मोठा धंदा झालेला आहे. या चोरीच्या धंद्याला अनेकांचे आशीर्वाद असतात, त्यामुळे या चोरीवर कोणतीच कारवाई महसूल विभागाकडून होत नाही. अधून मधून वाळूच्या कारवाया केल्या जातात, मात्र मुरुमाच्या चोरीवर कारवाई करण्याऐवजी पांघरून घालण्याचे प्रकार सर्रास होत असतात. आता पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर तरी या प्रकाराकडे डोळेझाक करणाऱ्या मंडळ अधिकारी, तलाठी आणि इतरांविरुद्ध जिल्हाधिकारी काही कारवाई करणार का ? का महसुलातले 'काळे ' धंदे तसेच सुरु राहणार ? हा प्रश्न आहेच.
 
                                    
                                 
                                 
                              


