Advertisement

लग्न झालं आणि वाटेतच तीन नवरी मुली झाल्या फरार, फसवणूक करणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक

प्रजापत्र | Tuesday, 19/01/2021
बातमी शेअर करा

जालना, 19 जानेवारी : अविवाहित तरुणांशी बनावट लग्न करून लुटून पळून जाणाऱ्या राज्यस्तरीय टोळीचा पर्दाफाश करण्यात चंदनजीरा पोलिसांना यश आलं आहे. गुजरातच्या 3 तरुणांशी बनावट लग्न करून मुद्देमालसह पसार झालेल्या 3 तरुणींसह 5 जणांच्या टोळीला अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून 4 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुजरात येथील पियुष वसंत यांना जालना येथील पाशा नावाच्या एका दलालाने एका महिलेच्या माध्यमातून 3 मुली दाखवून गुजरातच्या 3 मुलांसोबत त्यांचं लग्न लावून दिलं. लग्नानंतरचे सोपस्कार पार पाडून नवविवाहितांना गुजरातला घेऊन जाताना नागेवाडी शिवारात लघुशंकेचा बहाणा करून तिन्ही नवविवाहितांनी सामानासह पळ काढला.
याप्रकरणी चंदनजीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत औरंगाबाद, बुलढाणा आणि जालना या तीन जिल्ह्यातून 3 तरुणींसह दलाल महिला व नवरीचा भाऊ बनून त्यांच्यासोबत असणारा राहुल मस्के या क्रूझर चालकाला अटक केली आहे.

आरोपींच्या ताब्यातून फिर्यादीचे 3 महागडे मोबाईल व गुन्हात वापरलेले 2 असे एकूण 5 मोबाईल, बॅग व रोख रक्कम  व वापरलेली क्रूझर गाडी क्र. MH 13 BN 2426 असा एकूण 4 लाख 60 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे

Advertisement

Advertisement