नांदेड : निवडणूक म्हणजे वारेमाप खर्च असा सगळ्यांचा समज आहे. मात्र नांदेडमध्ये चिखली गावात ऊसतोड कामगार महिला ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालीय. एक नवा पैसा ही खर्च न करता ऊसतोड तोडणाऱ्या रेखा गायकवाड ह्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्या आहेत.जनमत पाठीशी असले की निवडणुका इतिहास घडवतात, हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. नांदेड जिल्ह्यातील चिखली हे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे मूळ गाव म्हणून जिल्ह्यात परिचित आहे. या गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्पष्ट बहुमत खासदार चिखलीकर यांच्या गटाकडे आहे. मात्र याच गावात खासदारांच्या विरोधी गटांकडून विजयी झालेल्या रेखा बाबुराव गायकवाड यांच्या विजयाची देखील चर्चा होतेय.
व्यवसायाने ऊसतोड कामगार महिला असलेल्या रेखा गायकवाड यांना चिखली गावकऱ्यांनी निवडून दिलंय. विशेष म्हणजे या गावचे सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जातीच्या महिलेला सुटले तर त्या सरपंचपदाच्या एकमेव दावेदार आहेत.
निवडणुकीला पैसाच खर्च करावा लागतो, असा समज या उदाहरणामुळे दूर होतो. गावकरी ज्याच्या पाठीशी त्याला नेतृत्व करायची संधी मिळते, हे या निमित्ताने सिद्ध होतंय. एक ऊसतोड कामगार महिला ग्रामपंचायतीत जाऊन आपल्या गावाच्या प्रश्नांना वाचा फोडणार याचा चिखली इथल्या ग्रामस्थांना अभिमान आहे.