Advertisement

तीन अण्णांच्या भूमिकांकडे जिल्ह्याचे लक्ष  

प्रजापत्र | Tuesday, 15/10/2024
बातमी शेअर करा

   
संजय मालाणी
बीड दि. १४   : बीड जिल्ह्याचे राजकारण राज्यात कायम चर्चेचे राहिलेले आहे. अगदी  शरद पवारांसारख्या नेत्यांनीही बीडचे राजकारण मती गुंग करणारे असते असे अनेकदा म्हटलेले आहे. विधानसभा निवडणुकांचा बिगुल आता कोणत्याही क्षणी वाजेल अशी परिस्थिती असताना बीड जिल्ह्यातील तीन अण्णांची चर्चा जोरात असून त्यांच्या भूमिका नेमक्या काय असतील याकडे सर्वांचे लक्ष आहे.
बीड विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे स्वतःचे एक  प्रस्थ आहेच . त्यांचा स्वतःचा असा एक मतदार आहे. मागच्या साडेचार वर्षांपासून अधिक काळ ते कोणत्याही पक्षात नाहीत मात्र ते सत्तेच्या वर्तुळात कायम आपले एक वेगळे वजन ठेवून राहिलेले आहेत. बीड मतदारसंघात सध्या महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपावरूनच मोठा संघर्ष आहे. अशा परिस्थितीत जयदत्त क्षीरसागर कोठे जाणार आणि नेमके काय करणार  याची उत्सुकता त्यांच्या समर्थकांसोबतच विरोधकांना देखील आहे. जयदत्त क्षीरसागर यांचे जिल्ह्यातील इतरही मतदारसंघांमध्ये स्वतःचे असे 'पॉकेट ' आहेत. त्यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे इतरही काही मतदारसंघांमध्ये ते 'काही ना काही ' घडवू किंवा  बिघडवू ' शकतात असे चित्र आजही कायम आहे.
आष्टी मतदारसंघातील सुरेश धस यांचेही असेच आहे. त्यांची तीन जिल्ह्यांची आमदारकी नुकतीच संपली आहे. सहा वर्षांपूर्वी ते विधानपरिषदेवर भलेही गेले असतील मात्र त्यांचे विधानसभेवरचे प्रेम लपून राहिलेले नाही. तीन जिल्ह्यांचे आमदार असतानाही त्यांनीं आष्टी मतदारसंघावरची पकड ढिली होऊ दिलेली नाही. आता आष्टी मतदारसंघ महायुतीमध्ये कोणत्या पक्षाकडे जाईल हा प्रश्न आहेच. गेवेराई आणि आष्टीची अदलाबदल महायुतीमध्ये होईल असे सांगितले जाते, मात्र हा मतदारसंघ भाजपकडे आला तरी भाजपकडून सुरेश धस आणि भीमराव धोंडे हे दोन दावेदार आहेत. भाजपला ऐनवेळी आपला 'ओबीसी ' डीएनए आठवला तर सुरेश धस यांना वेगळा विचार करावा लागेल. जिल्ह्यातील नारायणगड आणि भगवान भक्ती गड या दोन्ही ठिकाणच्या  मेळाव्याला हजेरी लावून त्यांनी आपली 'सर्वसमावेशकता ' दाखवून दिली आहेच. त्यामुळे त्यांना राजकीय अपरिहार्यता म्हणून वेगळा विचार करण्याची वेळ आलीच तर काय ? याची उत्सुकता केवळ आष्टीचं नव्हे तर जिल्ह्याला आहे.
गेवराई मतदारसंघात देखील लक्ष्मण पवार यांच्यासमोरचे चित्र वेगळे आहे. त्यांची मतदार संघावर चांगली पकड आहे. त्यांनी राष्ट्रवादी महायुतीत समाविष्ट झाल्यावर महायुतीतून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादीकडे जाणार असल्याचे सांगितले जाते , त्यामुळेच लक्ष्मण पवार भाजपपासून सुरक्षित अंतरावर आहेत. त्यांनी शरद पवार यांची भेटही घेतली आहे , मात्र अजून तरी त्यांचा निर्णय कोणता हे स्पष्ट होणे बाकी आहे.
बीड, आष्टी असो अथवा गेवराई , तिन्ही ठिकाणी 'अण्णा ' लढणार हे तर स्पष्ट आहे. पण ते लढणार कोठून आणि कसे यावर खूप काही अवलंबून असणार आहे. हे तिन्ही मतदारसंघ एकमेकांच्या लगतचे आहेत. तिन्ही मतदारसंघात या तिन्ही अण्णांचे 'आपले ' असे लोक असून पाॅवर आहे.आणि मागच्या काळात राजकीय पटलावर या तिन्ही 'अण्णांमध्ये ' सामंजस्य देखील चांगले पाहायला मिळालेले आहे. त्यामुळे भविष्यात या तिन्ही अण्णांची 'फ्रिक्वेन्सी' एकत्र आली तर निघणारा आवाज वेगळा असू शकतो अशा चर्चा आहेत.

Advertisement

Advertisement