बीड: राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून राज्य विधानपरिषदेवर नेमायच्या १२ पैकी ७ जागा निश्चित झाल्या असून त्यांचा शपथविधी आज दुपारी होणार आहे. यात राष्ट्रवादीच्या गोटातून बीड जिल्ह्याला संधी मिळेल ही अपेक्षा होती, मात्र आज तरी बीड जिल्ह्याची उपेक्षाच झाल्याचे चित्र आहे.
राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या माध्यमातून विधानपरिषदेवर जाण्यासाठी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोठी मोर्चेबांधणी केली होती. माजी विधीमंडळ सदस्य अमरसिंह पंडित, माजी विधानपरिषद सदस्य संजय दौंड यांच्यासह सावता परिषदेचे संस्थापक तथा राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी या सर्वांनाच आपल्याला विधानपरिषदेवर संधी मिळेल अशी अपेक्षा होती. चौघांनिही आपापल्या परीने 'सर्वार्थाने' यासाठी लॉबिंग देखील केली होती. मात्र सरकारने याबाबतीत बीड जिल्हयालाच हुलकावणी दिली आहे. राज्यपाल नियुक्त ७ सदस्यांचा शपथविधी आज होत आहे. यात राष्ट्रवादीच्या वाटयाला २ जागा आल्या असून त्यात पंकज भुजबळ आणि इद्रिस नाईकवाडी यांना पक्षाने संधी दिली आहे. त्यामुळे सध्यातरी बीडकरांचे स्वप्न भंगले आहे.
याचा परिणाम काही प्रमाणात आगामी विधानसभा निवडणुकांवर देखील होण्याची शक्यता आहे. गेवराई विधानसभा मतदारसंघात स्वतः विजयसिंह पंडित उमेदवार असणार असल्याने अमरसिंह पंडित काही प्रतिक्रिया देतील असे वाटत नसले तरी या उपेक्षेनंतरचे संजय दौंड, कल्याण आखाडे आणि राजकिशोर मोदी यांचे 'राजकारण' काहींच्या अडचणी तर काहींची डोकेदुखी वाढविणारे ठरेल.
प्रजापत्र | Tuesday, 15/10/2024
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा