कोल्हापूर-राज्यातील १२,७११ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरु झाली आहे. एकूण २ लाख, १४ हजार उमेदवारांचे भवितव्य आजच्या मतमोजणीमध्ये ठरणार आहे. या मतमोजणीचे प्राथमिक कल हाती आले असून काही ठिकाणाचे निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असल्याची माहिती समोर आली होती. मात्र चंद्रकांत पाटल्यांच्या खानापूरमधून शिवसेनेनं जबरदस्त कामगिरी केलीय. प्राथमिक कलांमध्ये गावातील सहा जागांवर शिवसेनेनं भगवा फडकवला आहे. शिवसेनेचा पराभव करण्यासाठी तीनही पक्षांमधील स्थानिक नेते एकत्र आले होते. मात्र शिवसेनेने यामधूनही बाजी मारल्याचे चित्र दिसत आहे.
कोल्हापूरमधील खानापूर ग्रामपंचायतीमधील ही अनोखी आघाडी साऱ्या राज्यात चर्चेत होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उघडपणे या आघाडीवर नाजारी व्यक्त केली होती. मात्र या आघाडीवरही शिवसेने आमदार प्रकाश आबिटकर यांनी मात करुन विजश्री भगव्याकडे खेचून आणली. या विजयाबरोबरच चंद्रकांत पाटलांच्या मूळ गावात म्हणजेच खानापूरमध्ये सत्तांतर घडलं आहे. सहा जागांवर विजय मिळवत शिवसेनेनं सत्ता काबीज करत भाजपाला जोरदार धक्का दिलाय. भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या गावातच सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये सर्वात मोठा विरोधक असणाऱ्या शिवसेनेसारख्या पक्षाने विजय मिळवल्याने हा चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
बातमी शेअर करा