Advertisement

 भैय्या फक्त आरती पुरतेच का ?

प्रजापत्र | Monday, 16/09/2024
बातमी शेअर करा

चर्चेतले
 बीड दि.१४  (प्रतिनिधी ) : मोठा गाजावाजा करून विधानसभेचे लागलेले डोहाळे पुरविण्याचा निर्णय अखेर काकांनी घेतला, स्वतःची निवृत्ती देखील जाहीर केली , पण त्यानंतर ज्यांना वारस म्हणून पुढे केले ते पुतणे आहेत तरी कोठे ? असा प्रश्न माजलगावमधील  मतदारांना पडला आहे. नाही म्हणायला काही गणेश मंडळांच्या आरतीसाठी या भैय्यांनी उपस्थिती लावली, मात्र माजलगाव मतदारसंघातील अतिवृष्टी असेल किंवा इतर गोष्टी , भैय्या कोठे दिसायला तयार नाहीत. त्यामुळे भैय्या फक्त आरती पुरतेच तर नाहीत ना असा प्रश्न मतदारांना पडत आहे.
माजलगाव मतदारसंघ हा तसा इतरांच्या तुलनेत जास्तच चाणाक्ष . गोदावरी, सिंदफणा , अगदी कुंडलिका आणि इतर अनेक नद्यांच्या पाण्याने पुनीत झालेला, म्हणजे खऱ्याअर्थाने 'बारा गावच पाणी पिलेला ' म्हणतात तसा. या मतदारसंघात मागच्या ७-८ वर्षांपासून आमदारांचे पुतणे असलेले जयसिंग भैय्या फिरत आहेत. जयसिंग भैय्यांना लोकसंपर्काचा वारसा त्यांचे वडील म्हणजे मतदारसंघातील काका धैर्यशील सोळंके यांच्याकडून मिळालेला, म्हणून तर गावागावात फिरताना भैय्यांना अडचण अशी ती आलीच नाही. भैय्या देखील मतदारसंघात भरपूर फिरले. जिल्हापरिषदेच्या सभापती असताना देखील त्यांनी संपर्क कायम ठेवला. तस मागच्या पंचवार्षिकलाच आ. प्रकाश सोळंकेंनी 'ही माझी शेवटची निवडणूक ' अशी भावनिक साद सर्वांना घातली होतीच . त्यामुळे देखील जयसिंग भैय्यांना 'मन मी लड्डू फुटा ' ची अनुभूती येणे साहजिक होते. मात्र नंतरच्या काळात स्वतः प्रकाश सोळंकेंनीच जयसिंग भैय्यांना अनेक ठिकाणी 'झोनबंदी ' केल्याचीही चर्चा होती. तसे अनेकदा झोनबंदी मोडून भैय्या कार्यकर्त्यांना भेटायचे, कार्यकर्तेच कशाला, ते अगदी वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांना देखील भेटत असल्याची कुणकुण प्रकाश सोळंकेंना लागल्याशिवाय राहील कशी ? त्यामुळे उगीच पुतण्याची मती 'बारा ' ठिकाणी फिरून अडचण होण्याऐवजी आ. प्रकाश सोळंकेनी कुठल्याश्या एका खेड्यात स्वतःची निवृत्ती आणि राजकीय वारस म्हणून जयसिंग सोळंके यांच्या नावाची घोषणा करून टाकली. आता दादांना खरोखरच हे मनातून करायचे होते , तर त्यासाठी एखादा मोठा कार्यक्रम घेता आला असता असे अनेकांना वाटते, पण असो, त्या वाटण्याला काय अर्थ ? तर हा सारा इतिहास उगाळण्याचे कारण म्हणजे या घोषणेनंतर खरेतर जयसिंग भैय्या पायाला भिंगरी लावून फिरतील असं अनेकांना वाटत होत.
पण मागच्या काही दिवसात जयसिंग भैय्या राजकीय पटलावर कुठे आहेत हेच अनेकांना माहित नाही. तसे ते गायब वगैरे झाले नाहीत, नाही म्हणायला काही ठिकाणी गणेश मंडळांच्या आरत्यांना त्यांनी उपस्थिती लावली, अनेक गणेश मंडळांना त्यांनी घसघशीत नसली तरी बरी म्हणता येईल अशी वर्गणी देखील दिली असे म्हणतात. पण गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांपलीकडे भैय्या इतर कुठे  रमताना फार दिसत नसल्याची चर्चा मतदारसंघात आहे. खरेतर सध्याचा काळ राजकीय धामधुमीचा , रोज काही तरी घडत बिघडत  आहे. अशावेळी शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला, त्यांच्या मागे उभे रहायला , शहरातल्या नागरिकांच्या समस्या सोडवायला आणि अशा अनेक गोष्टींसाठी लोकांना भैय्या हवे आहेत , पण भैय्या आहेत कोठे ? ते खरोखर जनतेच्या कामातच व्यस्त आहेत का काकांची घोषणा त्यांनाही गुगली वाटतेय , मतदारसंघातील इतरांच्याप्रमाणे  ?

Advertisement

Advertisement