Advertisement

वेदना सर्वांचीच, वाट मोकळी केली फक्त आ. पवारांनी

प्रजापत्र | Saturday, 14/09/2024
बातमी शेअर करा

 बीड दि. १३ (प्रतिनिधी) :'आपण सत्तेत असतानाही आपल्या मनावर तीन कर्तव्यदक्ष अधिकारी मिळणार नसतील तर मग राजकारण करायचे कसे आणि कशाला?' असे म्हणत महायुतीमधील गेवराईचे भाजप आमदार लक्षमण पवार यांनी खदखद व्यक्त केली. बीड जिल्हयात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये काय होत आहे हे सांगायला ही खदखद पुरेशी आहे. त्याचवेळी ही खदखद सर्वच लोकप्रतिनिधींच्या मनात आहे, व्यक्त केलीय ती फक्त आ. लक्ष्मण पवारांनी असेच चित्र जिल्हयात आहे.
बीड जिल्ह्यातील प्रशासनाची जी लक्तरे मागच्या दशकभरात राज्याच्या वेशीवर टांगली गेली आहेत, ती या पुर्वी कधी क्वचितच टांगली गेली असतील. जिल्हयातील प्रमुख अधिकाऱ्यापासून ते अगदी तलाठी, ग्रामसेवकाच्या नियुक्तीपर्यंत देखील राजकीय हस्तक्षेप कसा असतो हे पहायला मिळते ते बीड जिल्हयातच. एकतर बीड जिल्हयात यायला 'चांगले' अधिकारी तयार नसतात आणि 'थेट' येणारे अधिकारी येथील राजकारण्यांना नको आहेत. येणारा प्रत्येक अधिकारी आपला 'होयबा'च असला पाहिजे ही मानसिकता बीडच्या राजकीय संस्कृतीमध्ये मागच्या काळात वाढीस लागली आहे आणि आता त्यापुढे जाऊन तो अधिकारी आपल्याच पक्षाच्या इतरांना नाही तर केवळ 'आपल्यालाच' निष्ठावंत असावा याच भूमिकेतून अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याची संस्कृती सध्या बीड जिल्हयात रुजविली जात आहे.
गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी हीच खदखद बोलून दाखविली. ' मी कोणाचे नाव सांगितले नाही, पण तहसिलदार, बीडीओ, ठाणेदार कर्तव्यदक्ष द्या इतकीच अपेक्षा व्यक्त केली, पण ती देखील पुर्ण होत नाही, मग राजकारण करायचे कसे?' ही उद्विग्नता जर लक्ष्मण पवारांसारख्या आमदाराची असेल तर इतरांचे काय?
मागच्या काळात अनेकदा हे पहायला मिळालेच आहे. जिल्हा परिषदेला दोन महिन्यांपासून मुख्य कार्यकारी अधिकारी नाही, ज्यांची नियुक्ती झाली ते यायला तयार नाहीत. पोलीस महासंचालकांना म्हणे बीडमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बीडला 'थेट' पोलीस अधिकारी पाठवायचा होता, मात्र त्यांची देखील इच्छा बारगळली. जिल्हाधिकाऱ्यांपासून तहसिलदारांपर्यंत, जिल्हयात यायचे असेल तर कोणाकोणाची एनओसी आणावी लागते आणि अधिकाऱ्यांना कोणाकोणाच्या मागेपुढे फिरावे लागते हे ओंगळवाणे चित्र सध्या जिल्हा पहात आहे. कोणी थेट आयएएस, आयपीएस येणार असतील तर त्यांचे निघालेले आदेश कसे रद्द होतात हे पंकज कुमावत, करिश्मा राव, अगदी आणखी मागे जायचे तर प्रेरणा देशभ्रतार अशा किती तरी प्रकरणात पहायला मिळाले आहे.मध्यंतरी एलसीबीच्या प्रमुखांच्या नियुक्ती वरुन झालेले रणकंदन असेल किंवा अगदी एखाद्या ठिकाणच्या मंडळ अधिकाऱ्याची नियुक्ती, सत्तेतल्याच लोकांमधल्या कुरबुरी समोर आल्या होत्याच.नाथांचे दर्शन झाल्याशिवाय आणि तेथे 'भावभक्तीने' डोके टेकविल्याशिवाय बीड जिल्हयात कोठेच कोणालाच नियुक्ती मिळत नाही आणि नाथांचा आशीर्वाद असल्यास मग इतरांच्या कोणाच्याच, अगदी विरोधातल्या तर लांब सत्तेतल्या आमदारांचेही काही चालत नाही हे जिल्ह्याने अनुभवले आहेच. नाथासमोर डोके टेकवून 'तुमचा शब्दच अंतीम' असा शब्द देऊ शकणारेच अधिकारी येणार असतील तर लक्ष्मण पवारांसारख्यांना खदखद व्यक्त करण्यापलीकडे दुसरे करता तरी काय येणार?

Advertisement

Advertisement