बीड दि. ११ ( प्रतिनिधी) : दिवंगत गोपीनाथ मुंडेंनी जो बीड जिल्हा भाजपमय केला होता, तसेच पंकजा मुंडेंच्या पालकमंत्री पदाच्या काळातही ज्या बीड जिल्हयात भाजपचा दबदबा होता, तोच भाजप आज बीड जिल्ह्याच्या राजकारणात बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे. महायुतीच्या राजकारणात सत्तेचा मोठा वाटा अर्थातच राष्ट्रवादीला मिळाला आणि आता जागावाटपातही राष्ट्रवादीच प्रभावी राहणार असल्याच्या चर्चा आहेत, त्यामुळे बीड जिल्हयात कमळाला घरघर तर लागणार नाही ना? असा प्रश्न भाजपच्या निष्ठावंतांना छळतोय.
बीड जिल्हा हा दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचा जिल्हा. गोपीनाथ मुंडे यांनी या जिल्ह्याला भाजपमय केले. इतर पक्षातील लोकांना भाजपमध्ये घेऊन त्यांना आमदारकीचा गुलाल लावला. पुढे काही काळ पंकजा मुंडे यांनीही जिल्ह्यातील भाजपची शक्ती वाढविली. या सर्व काळात भाजपची खरी लढत होती ती राष्ट्रवादीशीच. शिवसेना आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांची जिल्ह्यातील शक्ती तशी मर्यादित. एखादा अपवाद वगळला तर अनेक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बीड जिल्हयात कॉंग्रेसचा पंजा मतदान यंत्रावर पाहणे म्हणजे दुर्मीळ योग. त्यामुळे निवडणूकांमध्ये आणि बाहेरही राजकीय विरोधक म्हणून चर्चा व्हायची ती भाजप आणि राष्ट्रवादीचीच. अगदी कालच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत होते.
आता महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आला आणि जिल्हयाचे पालकमंत्री पद देखील धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीकडेच. त्यामुळे भाजपचे विधानसभेचे दोन आणि अगदी काही दिवसांपर्यंत विधानपरिषदेचा एक सदस्य असतानाही भाजपला नियोजन समितीचा निधी कधी फारसा मिळाला नाही किंवा प्रशासनावर फार वचक देखील ठेवता आला नाही. अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या असतील किंवा आणखी काही प्रशासकीय बाबी, सगळीकडे राष्ट्रवादीचीच चलती असल्याने सत्तेत आल्यानंतर देखील भाजपच्या नेत्यांना आपल्या इच्छांना मुरडच घालावी लागली.
आता महायुतीच्या जागा वाटपात राष्ट्रवादीचा ४ जागांवर दावा आहे. असेच चित्र राहिले तर गोपीनाथ मुंडेंच्या परळीत विधानसभेच्या मतदान यंत्रावर कमळ नसेल अशी परिस्थिती. माजलगाव, आष्टी आणि गरजच पडली तर गेवराईवर देखील राष्ट्रवादीनेच दावा केला तर माजलगावमध्ये रमेश आडसकर, मोहन जगताप, बाबरी मुंडे, आष्टीत सुरेश धस, भिमराव धोंडे, गेवराईत लक्ष्मण पवार यांनी करावे तरी काय? परळीतल्या भाजप कार्यकर्त्यांनी आता छोटया मोठया कामासाठी कोणाचे उंबरे झिजवायचे हा प्रश्न आहेच. बाकी बीड मतदारसंघात भाजपचे फार काही नाही. येथे जिल्हाध्यक्षांना आमदारकिची स्वप्ने पडत असली तरी त्यांची भाजप साठीची उपयुक्तता लोकसभेत समोर आली आहेच. पण हे सारे खरे असले तरी आता भाजपने जिल्हयात माघार तरी किती घ्यायची? लाडकी बहीण योजना असेल किंवा संजय गांधी समिती, भाजप कार्यकर्त्यांच्या पदरी उपेक्षाच, अन ती देखील दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या जिल्हयात...