आरसा विधानसभेचा / उमरगा-लोहारा
खाजा मुजावर
राज्यातील विधानसभा निवडणुकीचे घोडे मैदान जवळ जवळ येवू लागलेले आहे. विधानसभा लढविण्यासाठी अनेकजण बाशिंग बांधून तयार आहेत परंतु काही अपवाद वगळता मतदारसंघातील बहुतांश सत्ताकेंद्र हे एकाच जागी फिरताना दिसत आहेत. उमरगा - लोहारा विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. सध्या महायुतीचे ज्ञानराज चौगुले हे कार्यरत आमदार आहेत, महविकास आघाडीकडून कोण उमेदवार असेल, कुठल्या पक्षाला उमेदवारी मिळेल हेच अजून स्पष्ट झाले नसल्याने सध्यातरी महायुतीकडून आमदार चौगुले यांची दावेदारी प्रबळ मानली जाते.
हा मतदारसंघ अनेक वर्षापासून शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो परंतु मागच्या काळात राज्यात झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणात आमदार चौगुले हे शिंदे गटासोबत जावून सत्तेत सामील झाले. त्यामुळे त्यांच्या विरोधातही मतदारसंघामध्ये नाराजीचा प्रचंड सुर सुरुवातीच्या काळात दिसून आला. त्यावेळीचे तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, रणधीर पवार, विलास व्हटकर यांच्यासह अनेक निष्ठावंत शिवसैनिकांनी ठाकरे गटात राहणे पसंद केले. पक्ष बदलामुळे मतदारसंघातील नाराजीचा सूर पाहता आमदार चौगुले यांनी सातत्याने निधी आणून विकास कामे करायला सुरुवात केली. सलग तीन वेळा निवडून येवून पण मंत्रीपद देता आले नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौगुले यांना भरघोस निधी देवून खुश करण्याचा प्रयत्न केला. आलेल्या निधीतून मतदारसंघात जो विकास झाला त्याच्या जीवावर निवडणुकीला सामोरे जाणार असले तरी विजयी चौकार मारणे आमदार चौगुले यांच्या साठी सोपे नसणार आहे.
लोकसभा निवडणुकीत मतदार संघातून महाविकास आघाडीचे खासदार ओम राजे निंबाळकर यांना मोठं मताधिक्य मिळाले असल्याने महविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झालेली दिसून येत आहे. ठाकरे सेनेचे विलास व्हटकर, काँग्रेसचे विजय वाघमारे, अशोक राजे सरवदे, सातलिंग स्वामी, प्रा संजय कांबळे तुंगावकर, रमाकांत गायकवाड, ऐनवेळी भाजपाचे कैलास शिंदे, दिलीप भालेराव, राष्ट्रवादीचे दिग्विजय शिंदे हे सुध्दा रिंगणात उतरवले जावू शकतात. सर्व इच्छुक मतदारसंघ पिजून काढत असेल तरी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण राहणार हे स्पष्ट झालेले नाही.
आमदार चौगुले हे शिंदे गटात गेल्यानंतर त्यांचे राजकीय गुरू माजी खासदार प्रा रविंद्र गायकवाड मात्र ठाकरे सेनेत तटस्थ होते परंतू अल्पावधीतच गुरू ला सोबत घेण्यात चौगुले यशस्वी ठरले. शिवसेना नंतर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडली आपल्या समर्थक आमदारासोबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सुध्दा शिंदे सरकार मध्ये सामील झाले. मतदासंघातील राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार हे अजित पवार गटात गेल्याने महायुतीचे घटक बनले. श्री बिराजदार यांच्या ताब्यात साखर कारखाना, शैक्षणिक संस्था, जिल्हाभरात भाऊसाहेब बिराजदार बँकेचे जाळे असल्याने यांची ही साथ जमेची ठरणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेसचे मोठे नेतृत्व माजी मंत्री बसवराज पाटील यांनी सुद्धा काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला, त्याची सुद्धा मोठी ताकद मतदार संघात आहे.याचा ही फायदा चौगुले यांना होणार आहे परंतु आमदार चौगुले हे ज्या संस्थेत कर्मचारी होते, प्रत्येक वेळी यांना निवडून आणण्यात मोठा वाटा उचलणारी संस्था म्हणजे भारत शिक्षण संस्था. या संस्थेचे आश्लेष मोरे यांनी काँग्रेसची धुरा आपल्या हातात घेतली असून सध्या ते काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत मतदारसंघात सक्रिय आहेत. भारत शिक्षण संस्थेचे खूप मोठे जाळे मतदारसंघात आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, ठाकरे सेनेचे नेते बाबा पाटील, आश्लेष मोरे हे लोकसभेच्या वेळी तालुक्यातून एक मोठं मताधिक्य खासदार ओम राजे निंबाळकर यांना देण्यात यशस्वी झाले होते. विधानसभेला पण एक मोठे आव्हान चौगुले यांना ते देवू शकतील का ही येणारी वेळ ठरवेल.
प्रजापत्र | Tuesday, 10/09/2024
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा