Advertisement

संपादकीय अग्रलेख- मतदारांना गृहीत धरण्याची चूक

प्रजापत्र | Tuesday, 10/09/2024
बातमी शेअर करा

'इतका विकास करून देखील जर पराभवाचं होणार असेल तर बारामतीमधून उभे राहायचे का नाही हे ठरवावे लागेल' हे अजित पवारांचे विधान ते बारामतीमधून उभे राहून जणू काही जनतेवर उपकार करीत आहेत या धाटणीचे आहे. त्यात आत्मपरिक्षणाचा सूर नाही. मुळात लोकसभा निवडणुकीत जे घडले त्याचा अर्थ मतदारांनी विकास नाकारला असला काही काढण्यात काहीच अर्थ नाही. आपण काहीही केले तरी मतदार कुठे जाणार ही जी मतदारांना गृहीत धरण्याची मानसिकता होती, त्याचा फटका लोकसभेत बसला यावर आता तरी अजित पवार विचार करणार आहेत का?
 

बारामतीमधील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी मतदारसंघातील मतदारांबद्दल नाराजीचा सूर लावला. आपण या मतदारसंघात विकासाची इतकी कामे केली, अर्थ खात्यासारखे 'अवघड' खाते सांभाळले आणि त्यामुळेच आपण मोठ्या प्रमाणावर निधी आणू शकलो, तरीही आपला पराभव झाला. असा पराभव होणार असेल तर येथून उभे राहायचे का नाही? हा अजित पवारांचा कार्यकर्त्यांना विचारलेला प्रश्न होता. अजित पवारांनी बारामतीमध्ये विकास केला यात कोणाचेही दुमत असण्याचे देखील काहीच कारण असणार नाही. इतका प्रदीर्घकाळ सत्तेच्या सोबत म्हणजे सत्तेतच असताना आणि मुख्य म्हणजे सत्तेच्या चाव्या स्वतःकडे असताना विकास निधी आणता येणारच. बरे बारामती मधील जनतेने वारंवार संधी दिली, किंबहुना राज्यातील जनतेने संधी दिली म्हणून तर अजित पवार सत्तेच्या खुर्च्या उबवू शकले आणि त्या खुर्च्यांवर बसता आले म्हणून त्यांना विकास निधी आणता आला. मग बारामतीमध्ये विकास केला म्हणून अजित पवारांनी येथील जनतेवर उपकार केले आहेत का?
बरे लोकसभा निवडणुकीत जनतेने नेमके कशाला नाकारले याचा तरी विचार अजित पवार कधी करणार आहेत का नाही? मतदार जेव्हा मतदान करतो, त्यावेळी तो केवळ विकासाच्या मुद्द्यावर मतदान करत नाही. मतदारांच्या मनात जे अनेक मुद्दे असतात, त्यापैकी विकासकामे हा एक असू शकतो, मात्र मागच्या काही काळात आपल्याकडचे मतदान झाले आहे ते सातत्याने नकारात्मक म्हणावे असे. कोणी तरी एक नको म्हणून मतदार ठरवून टाकतात आणि मग तसे मतदान होते. मागच्या लोकसभेत महाराष्ट्रातील मतदारांनी भाजप आणि त्यांची महायुती नको असे ठरवून टाकले होते. बरे विकासाचाच म्हणायचे तर निधी भलेही अजित पवारांनी दिला असेल, पण तो आणणाऱ्या खासदार सुप्रिया सुळेच होत्या ना? मग मतदार सुप्रिया सुळेंना जगले तर त्यात त्यांचा काय दोष?
जे कारण अजित पवारांना माहित आहे पण त्यांना ते दाखवायचे नाही, किंवा त्यावर भाष्य करण्याची त्यांच्यात हिम्मत आणि धमक देखील, ते म्हणजे मतदारांना गृहीत धरण्याची राजकारण्यांची मानसिकता. तीच मानसिकता बारामतीच्या बाबतीत अजित पवारांची होती, भाजपची होती. बारामती पवार कुटुंबाला मानणारा भाग आहे, पण म्हणून तेथील मतदार शरद पवारांना बाजूला सारून त्यांच्या विरोधात अजित पवारांचे ऐकेल, हा अजित पवारांचा फाजील आत्मविश्वास होता, त्यातही भाजपचे चंद्रकांत पाटलांसारखे वाचाळवीर बारामतीमध्ये येऊन 'आम्हाला पवारांचे राजकारण संपवायचे आहे' असे जर जाहीरपणे बोलत असतील, तर ज्या पवारांनी या भागाचा विकास केला, त्या पवारांचे  राजकारण संपणे बारामतीकरांना  होते? खरेतर या साऱ्या बाबींचे विश्लेषण त्यावेळी झाले आहेच, पण आता अजित पवार पुन्हा एकदा मतदारांच्या माथी  तो विषय काढणार असतील तर मतदार कसा विचार करतात यावरही चर्चा व्हायला हवी. कोणत्याही मतदारसंघात सत्तेचे लाभार्थी म्हणवणारे जे काही असतात, त्यांची संख्या फारच नगण्य असते. म्हणजे साधारण ३ लाख मतदारांचा एक विधानसभा मतदारसंघ गृहीत धरला, तर सर्व पक्षांमधील मिळून गुत्तेदार किंवा सत्तेच्या लाभावर नजर ठेवून असलेल्यांची संख्या एक ते दोन टक्के म्हणजे सहा हजारांच्या नसते. आणि लोक सत्तेचे फायदे पाहून आपल्या नेत्याचे होयबा झालेले असतात, पण म्हणून सामान्य जनता प्रत्येकवेळी नेत्याची होयबा होईलच असे नसते. राजकारण्यांनी काहीही तडजोडी केल्या तरी जनता ते निमूटपणे मान्य समजत येत नसते. अजित पवारांची गोची झाली ती तेथेच. इथले लोक जाणार कोठे हा जो सत्तेचा अहंकार आहे, त्या अहंकाराला जनतेने नकार दिला आहे. त्यामुळे यापुढेही जनता कोणत्याही तडजोडी मान्य करील आणि आपल्यामागे 'मुकी बिचारा कुणी हाका?' सारखी आपल्यासोबत येईल याभरणात कोणी राहू नये. जनतेच्या माथी खापर फोडण्यापेक्षा जरा आत्मपरीक्षण करावे हे उत्तम.
 

 

Advertisement

Advertisement