बीड: काल कोणीतरी बोलत होते, ते सहज आपलं काणावर आलं, एकजण सांगत होता, दोन दिवसांपूर्वी म्हणे त्याला पाहून स्वत: दादांनी गाडी थांबवली अन खाली उतरून काय चाललय? बरय कां सगळं असं सुध्दा विचारलं म्हणे. दुसऱ्या माणसाचा काही याच्यावर विश्वास बसत नव्हता, दादांनी गाडी थांबवून कार्यकर्त्याची विचारपुस केली म्हणजे जरा अतीच... पण हे खरं आहे म्हणतात... आता दादा कोण म्हणून काय विचारता राव... हे सगळं चालु आहे ते आपल्या प्रकाश दादांबद्दल... तुम्हालाही वाटतयं न? 'काय सांगता... दादा बदललेत? ' म्हणून...
माजलगावचे आमदार असलेले दादा म्हणजे लई मोठ्ठा माणूस... कंदील चिन्ह घेऊन पहिल्यांदा माजलगाव विधानसभेच्या रिंगणात उतरले, त्यावेळी जवळच्यांनीच ' कंदील लावा अन 'प्रकाश' पाडा' असं मतदारसंघात सांगितलं होत म्हणतात... तेंव्हापासून दादा अगदी जवळच्यांवर देखील डाफरतात म्हणे. खरंतर सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला म्हणतात तसा हा माणूस, विधानसभेला पहिल्यांदा पराभव झाला, पण नंतर त्या पराभवाचं असं उट्ट काढलं म्हणतात... एक आमदार दुसऱ्यांदा निवडून न देण्याची या मतदारसंघाची परंपरा, पण दादा दुसऱ्यांदाच काय सलग तीन वेळा आमदार झाले. नंतर एकदा पराभव झाला, पण ते पुन्हा आले. सध्याची त्यांची आमदारकिची चौथी टर्म.
पण या सगळ्या काळात दादांना कधी कोणी फार कार्यकर्त्यांमध्ये रमताना, त्यांच्याशी हसी मजाक म्हणतात तसं करताना पाहिलं नव्हतं... दादा म्हणजे एक ' डेकोरम' चा माणूस, 'हं , बोला काय कामं? ' अशी त्यांची संवादाची सुरुवात... बोलण्यात एक जरब, आता लोकांना ते 'डाफरण' वाटतं त्याला दादांनी तरी काय करावं... बरं ते सभागृहात सुध्दा ' मग आम्ही इथं कशाला आलोत, आं SS' असं विचारतातच ना. त्यांचा अभ्यास पण तसा दांडगा... बाकी कारखाना वगैरे चांगला चालवलेला, तेवढं सुतगिरणी, टेक्सटाईल पार्क का काय म्हणतात हे नाही जमलं म्हणा, पण ते चालायचच. तर असे हे दादा कधी सामन्यांमध्ये रमले नाहीत... कोणाच्या खांद्यावर हात टाकणं आणि बाकी कसायस, काय असल्या अघळपघळ गप्पा मारणं हा काही त्यांचा स्वभाव नाही. त्यांचे जवळचे म्हणणारे सरपंच, चेअरमन असले कार्यकर्तेही तसे त्यांच्यापासून चार हात अंतर राखूनच राहतात. मागच्या काळात दादांच मतदारसंघातलं लक्ष देखील अधिकच वाढलेलं, अगदी वाळुच्या घाटापासून पार तहसिलपर्यंत दादा डोळयात तेल घालणार... अगदी छोटं मोठं कंत्राट सुध्दा दुर्लक्षीत होणार नाही अशी करडी नजर... त्यामुळे दादाला काही बोलायचं म्हणजे साधी गोष्ट नव्हती...
पण आता मात्र वेगळचं ऐकायला येतय... दादा म्हणे सामान्य कार्यकर्त्याला देखील अगदीच गोड बोलतायत, गाडी काय थांबवतायत, अगदी कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याची ख्यालीखुशाली विचारतायत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समोरच्याच ऐकून घेतायत... कितीही पटलं नाही तरी ऐकून घेतायत... त्यांचा म्हणे सामान्यांशी 'कनेक्ट' देखील वाढलाय, थोडक्यात काय तर या भागाला जसा नेता हवा होता, तसं म्हणे आता दादा वागतायत.त्यांनी खरचं 'संवाद' वाढवलाय म्हणे. आता काही जण बोलतात, दर पाच वर्षातले सहा महिने दादा असेच बदलतात म्हणून... म्हणोत बापडे, आपल्याला काय त्याचे... पण खरचं दादा बदलले असतील तर आनंदच आहे की, दादांची 'मोहीनी ' जर अशीच वाढली तर अनेकांना ' हाबाडा' बसायचा हे मात्र आहेच की. दादा म्हणे सामान्य कार्यकर्त्याला देखील अगदीच गोड बोलतायत, गाडी काय थांबवतायत, अगदी कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याची ख्यालीखुशाली विचारतायत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समोरच्याच ऐकून घेतायत... कितीही पटलं नाही तरी ऐकून घेतायत... त्यांचा म्हणे सामान्यांशी 'कनेक्ट' देखील वाढलाय, थोडक्यात काय तर या भागाला जसा नेता हवा होता, तसं म्हणे आता दादा वागतायत.त्यांनी खरचं 'संवाद' वाढवलाय म्हणे. आता काही जण बोलतात, दर पाच वर्षातले सहा महिने दादा असेच बदलतात म्हणून... म्हणोत बापडे, आपल्याला काय त्याचे...
बातमी शेअर करा