Advertisement

आ.नमितामुंदडांच्या विरोधात शरदचंद्र पवार गटात  अनेक इच्छुक मैदानात

प्रजापत्र | Friday, 06/09/2024
बातमी शेअर करा

आरसा विधानसभेचा /केज
 जगन सरवदे
 अंबाजोगाई दि. ५ : केज विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आ.नमिता  मुंदडा यांना घेरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची टिम सक्रिय झाली आहे. तिकिट कोणाला मिळणार हे अद्यापही निश्चीत नाही. ही निवडणुक राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शेवटची संधी मानली जात आहे. त्यामुळे या मतदारसंघातील इच्छुक उमेदवार हाबूक ठोकून मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. तर विद्यमान खासदार बजरंगबप्पा सोनवणे हे कोणाच्या पाठिशी उभे राहतात ते पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण, मागील काही निवडणूकांपासून केज विधानसभा, लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सोनवणे फॅक्टर प्रभावी ठरलेला आहे.
केज विधानसभा मतदारसंघात सध्या सर्वच इच्छुक उमेदवारांनी गाठी भेटीवर जोर दिला आहे. निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. केज मतदारसंघातून लढण्यासाठी माजी आ.पृथ्वीराज साठे, माजी आ.प्रा. .संगिता ठोंबरे, डॉ. .अंजली घाडगे, ऍड.अनंत  जगतकर, बाबुराव पोटभरे व इतरांनी ही जोरदार तयारी सुरू केली आहे. माजी आमदार पृथ्वीराज साठे हे सर्वप्रथम अडीच वर्षे "मुंदडा "यांच्या आशिर्वादानेच आमदार झाले होते. पुन्हा त्यांना आमदार होता आले नाही. जनसंपर्क भक्कम नसल्याने  व दिलेली आश्वासने पुर्ण होत नाहीत. त्यामुळे अनेकांच्या रोषाचा सामना त्यांना करावा लागतोय. हे चित्र आहे. ते मतदारसंघात फिरतात माञ कोणत्याही एका समाजाचे नेते म्हणून त्यांना लोकमान्यता मिळत नाही. माजी आमदार संगिताताई ठोंबरे या पाच वर्षे आमदार होत्या . अंबाजोगाई, केज व नेकनूर या भागात त्या विकास कामात प्रभाव निर्माण करू शकल्या नाहीत. काळवीट तलाव उंची वाढविणे, लोखंडी सावरगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक अजुनही दुर्लक्षितच आहे. एम.आय.डी.सी बद्दल फसव्या घोषणा त्यांच्या काळात झाल्या पण, यशस्वीपणे आमदार म्हणून त्या परिचित नाहीत. त्या भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व मनोज जरांगे यांच्या संपर्कात त्या आहेत. परवा झालेला हल्ला बरेच काही सांगुन जातो. तर अंजलीताई घाडगे या नविनच आहेत. कोरी पाटी म्हणून मतदार त्यांना पाहतोय. बाबुराव पोटभरे हे आक्रमक नेते आहेत. तर ऍड.अनंतराव जगतकर हे ज्येष्ठ नेते आहेत.
अशा परिस्थितीत विद्यमान आमदार नमिताताई अक्षय मुंदडा या अनुभवी, तरूण, प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी काम करणाऱ्या नेत्या आहेत. त्यांना पती अक्षय मुंदडा व सासरे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांची समर्थ साथ व भक्कम पाठिंबा, मदत लाभत आहे. केज मतदारसंघात मागील पाच वर्षांत शेकडो कोटी रूपयांचा निधी आ.मुंदडा यांनी खेचून आणला आहे. सासूबाई  विमलताईंचा वारसा, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा विश्वास, कार्यकर्त्यांचे मोठे संघटन व सत्ताधारी पक्षाच्या आमदार म्हणून आजही केज विधानसभा मतदारसंघात आमदार नमिता  मुंदडा हे प्रभावी नेतृत्व आहे. सध्या इच्छुक उमेदवारांपैकी अंजलीताई घाडगे या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार बजरंग सोनवणे यांच्या संपर्कात असून खा.सोनवणे घाडगेंची शिफारस वरिष्ठाकडे करतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.  
केज विधानसभा मतदारसंघ हा गेल्या 45 वर्षांपासून राखीव आहे. 2009 साली या मतदारसंघाची पुर्नरचना झाली. पण, पुन्हा हा मतदारसंघ अनुसुचित जाती जमातीसाठी आरक्षित झाला. खुल्या प्रवर्गातील उमेदवार लढण्यासाठी इच्छुक असताना ही आरक्षित जागेमुळे अनेकांना आमदार होता आलेले नाही. जवळपास राजकारण्यांच्या तीन पिढ्या यात गेल्या आहेत. 2029 साली हा मतदारसंघ अनारक्षित राहणार असल्याची चर्चा आहे. 2024 ची निवडणुक ही आगळीवेगळी आणि अनपेक्षित होणार आहे. विद्यमान आमदारांना घेरण्यासाठी जोरदार रणनिती सुरू आहे. विद्यमान आमदार यांनी विकासकामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. दांडगा जनसंपर्क ही मुंदडा यांची जमेची बाजु आहे.  विद्यमान आमदार सोडता भाजपाकडून लढण्यासाठी कोणीही पुढे आले नाही व दावा ही केलेला नाही. त्यामुळे आ.मुंदडा यांना किती ही घेरण्याचा प्रयत्न झाला. तरी ही विरोधक यशस्वी होतील याची काहीच शाश्वती दिसत नाही. केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आ.पृथ्विराज साठे, माजी आ.प्रा. संगिता  ठोंबरे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.अंजली  घाडगे यांची नांवे पुढे आली आहेत. कारण, सध्या सत्ताधार्‍यांविषयी जनसामान्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. फोडाफोडीचे राजकारण आणि भ्रष्टाचार्‍यांची सोबत सामान्य माणसाला पटलेली नाही. लोकसभा निवडणुकीतीलजे चिञ पहावयास मिळाले ते आता विधान सभेत दिसणार नाही . त्यामुळे ही निवडणुक रंगतदार होणार हे स्पष्ट आहे.
------------------------------------------------------------------

Advertisement

Advertisement