बीड दि. ३ (प्रतिनिधी ) : तसे तर लोकसभा निवडणुकीतच 'जरांगे फॅक्टर ' हा विषय चर्चेचा राहिलेला होताच. आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने या फॅक्टरची चर्चा आता अधीकच वाढली आहे. कोणत्याही मतदारसंघात नेत्यांना त्यांचेच कार्यकर्ते 'साहेब , बाकी सगळे ठी, पण एकदा पाटलांना भेटून येत येते का बघा ' असे सांगताना दिसून येत आहेत. या साऱ्या प्रकारची एक अस्वस्थता, किमान मराठवाड्यातल्या तरी बहुतांश मतदारसंघांमध्ये आहे. तर जरांगे आपल्यालाच आशीर्वाद देतील या अपेक्षेवर अनेकांना विधानसभेचे स्वप्न पडत आहेत. दुसरीकडे छोट्या मोठ्या कामांसाठी आपल्याकडे येणार कार्यकर्ता मताच्या भूमिकेबाबत मात्र पाटलांकडे बोट दाखवितो याची एक असूया देखील पुढाऱ्यांच्या मनात आहेत
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला, त्यामागे जी अनेक करणे आहेत, त्यापैकी जरांगे फॅक्टर हे एक महत्वाचे कारण, किमान मराठवाड्यात तरी हे कारण प्रभावी राहिले. आता विधानसभेला तर त्याची तीव्रता अधिकच वाढली आहे. मनोज जरांगे म्हणजे वर्ष दीड वर्षांपूर्वी साधारण असणारा माणूस आता राज्याच्या केंद्रस्थानी येऊन पोहचला आहे. जरांगे यांच्या भूमिकांबाबत , त्यांच्या मागण्यांबाबतआणि त्यांच्या आंदोलनाच्या पद्धतींबाबत वेगवेगळे मतप्रवाह असतीलही , पण एखाद्या समूहाच्या मागण्यांचे एखादे आंदोलन एक वर्षापेक्षा अधिक काळ तितक्याच तीव्रतेने चालविले जाते, हे मागच्या काळात दुर्मिळ झाले होते, मनोज जरांगेंनी ते करून दाखविले . त्यामुळेच मराठा समाजात त्यांच्याबद्दलची क्रेझ अधिकच वाढत गेली. लोकसभा निवडणुकीत त्यांनी थेट नाही तरी अप्रत्यक्ष 'कोणाला पाडायचे ' ही भूमिका अनेक ठिकाणी घेतली होतीच, त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत 'जरांगेंचा कौल ' मिळावा यासाठी राज्याच्या अनेक भागांमधून विशेषतः मराठवाड्याच्या बीड, धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजी नगर, जालना या जिल्ह्यांमधून इच्छुकांनी त्रवली शर्तीच्या भेटी वाढविल्या आहेत. उमेदवार उभे करायचे का कोणाला विरोध करायचा याबाबत अद्याप जरांगेची भूमिका ठरलेली नाही , पण किमान जरांगेंचा आशीर्वाद मिळावा अशी अपेक्षा सर्वांनाच आहे, आणि आपल्या मतदारसंघात जरांगे काय भूमिका घेतील याची अस्वस्थता देखील अनेकांच्या चेहऱ्यावर दिसतेय.
मुळात गावखेड्यातील असतील किंवा शहरातील कार्यकर्त्यांची कामे पडतात ती नेत्यांकडे. त्यांच्या भागातील लोकप्रतिनिधींकडे. आजही अशी कामे घेऊन कार्यकर्ते नेत्यांकडे येतात . नेते , पुढारी ती कामे मार्गी लावण्याचा त्यांच्यापरीने प्रयत्न करतात . विषय साहजिकच निवडणुकीचा निघतो , लोकसभेत कसे झाले अशी विचारणा होते , आणि विधानसभेचे काय असे म्हणल्यावर 'साहेब आम्ही तुमचेच , पण एकदा पाटलांकडे जाऊन या ' असं तो कार्यकर्ता सहजच बोलून जातो. त्याच्या मनात आपल्या नेत्याची शक्ती वाढावी अशीच भावना असते, पण आपला कार्यकर्ता इतरांकडे बोट दाखवीत असेल तर नेत्याच्या मनात काहीशी असूया निर्माण होणारच ना. तर जरांगे फॅक्टर बद्दल सध्या असे सारे आहे.
प्रजापत्र | Wednesday, 04/09/2024
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा