Advertisement

वाळू तस्करांवर तोंड पाहून कारवाई !

प्रजापत्र | Friday, 23/08/2024
बातमी शेअर करा

बीड-गौण खनिजाचे उत्खनन कमी दाखविण्यासाठी लाच घेताना एक मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याची घटना ताजी असतानाच आता गोदापात्रात तहसीलदार देखील तोंड पाहून कारवाया करीत असल्याचे चित्र आहे.तहसीलदारांसमोरून मोठ्या प्रमाणावर गाड्या भरून जात असताना केवळ एखाद्याच वाहनावर कारवाई केली जाते आणि वरती 'पुन्हा माझ्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही, मी तरी काय करू' असे सांगायलाही तहसीलदार मागे पुढे पाहत नसल्याचे चित्र गेवराई तालुक्यात पाहायला मिळत आहे.यामुळे आता जिल्हाधिकारी या प्रकरणात काही भूमिका घेणार का असा प्रश्न निर्माण होत आहे. 

 

     बीड जिल्ह्यात वाळू तस्करीची मोठी अर्थव्यवस्था आहे.त्यामुळेच जिल्ह्यातील गोदापट्ट्यातील नियुक्त्या देखील 'बहुमोल' मानल्या जातात.जिल्ह्यात वाळू तस्करी मोठ्याप्रमाणावर सुरु असतेच,अधून-मधून प्रशासन आणि पोलीस कारवाया करतात.नव्याने बदलून आलेल्या पोलीस अधीक्षकांनी आता वाळू तस्करीला लक्ष केले आहे.त्यामुळे गोदापट्ट्यात पोलिसांचा जोर वाढला आहे. हे लक्षात आल्यानंतर आता महसूल प्रशासन देखील सक्रिय झाल्याचे चित्र गेवराई तालुक्यात आहे.मात्र तहसील कार्यालयाच्या पथकाकडून किंवा तहसीलदारांच्या पथकाकडून अशा कारवाया तोंड पाहून केल्या जात असल्याचे चित्र आहे.गुरुवारच्या रात्री गेवराईच्या तहसीलदारांनी गोदापात्राच्या अलीकडेच रस्त्यावर कारवाई करून केवळ एक वाहन जप्त केले, मात्र त्याचवेळी त्यांच्या समोरून अनेक पात्रात वाहने वाळू भरून जात होती त्यांच्या डोळ्यादेखत हे सारे होत असताना तहसीलदार मात्र एकाच वाहनावर कारवाई करतात याचे आश्चर्य अनेकांनी व्यक्त केले.त्यावर 'माझ्याकडे पुरेसे मनुष्याबळ नाही' अशी बतावणी तहसीलदार करीत असल्याची माहिती आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्याचे व्हिडीओ फुटेज जर पहिले गेले तर खरोखर किती वाहने वाळू भरून जातात हे सहज लक्षात येईल,मग कारवाई केवळ एखाद्याच वाहनावर कारवाई कशी होते? वाळू तस्करांवर कारवाया व्हायलाच हव्यात,पण हे करताना सरसकट कारवाई व्हायला हवी, त्या सरसकट कारवाईची तहसीलदारांना 'अलर्जी ' कशामुळे हा मुद्दा सध्या चर्चेत आहे. गौण खनिजच्या विषयातली लाचखोरी वेगवेगळ्या मार्गाने समोर येत असतानाच अशा तोंड बघून होत असलेल्या कारवाया आता चर्चेचा विषय झाला आहेत.या प्रकरणात जिल्हाधिकारी अविनाश पाठक लक्ष घालणार का याकडे आता जिल्ह्याचे लक्ष असेल. 

Advertisement

Advertisement