पुणे- प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू हे महायुतीला राम राम करणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. कडू यांनी आज पुण्यातील मोदी बागेत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी ते महाविकास आघाडी बरोबर येणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीआधी बच्चू कडू यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. तूर्तात महायुती सोडण्याचा आणि महाविकास आघाडीत येण्याचा कोणता हेतू नाही असं त्यांनी म्हटलं आहे. पण, ते नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन दबावतंत्राचा वापर करत असल्याचं बोललं जात आहे. महायुतीवर दबाव टाकण्यासाठीच ते शरद पवार यांची भेट घेत आहेत.
शरद पवार यांची भेट आधीच ठरलेली होती. त्याप्रमाणे मी त्यांना भेटायला आलो आहे. शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगबांधवांसाठी आम्ही काहीही करू. त्यामुळे कोणासोबत जायचं आणि कोणासोबत नाही याचा निर्णय १ सप्टेंबरनंतर करू असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.
१ सप्टेंबरपर्यंत आम्ही सरकारला वेळ दिला आहे. तोपर्यंत सरकारने आमच्या मागण्यांवर निर्णय घ्यावा. शेतकरी, शेजमजूर, दिव्यांगबांधव यांचा विचार सरकारने करावा. मी नाराज नाही. आमच्या बांधवांच्या मागण्या पूर्ण व्हावेत हीच आमची मागणी आहे. शरद पवारांसोबत शेतकरी आणि शेतमजूर यांच्या विषयावर चर्चा करणार आहे, असं बच्चू कडू म्हणाले.
बच्चू कडू हे महायुतीवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांनी वेळोवेळी महायुती विरोधात वक्तव्य केली आहेत. त्यामुळे ते महाविकास आघाडीमध्ये सहभागी होतील असं बोललं जातं. याच दृष्टीकोनातून त्यांच्या शरद पवारांच्या भेटीकडे पाहिलं जात आहे. मात्र, यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, शरद पवारांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. शिवाय, हे महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याचे संकेत नाहीत.