महागाई, बेरोजगारी , कोलमडलेली आरोग्य व्यवस्था यामुळे भाजपला लोकसभा निवडणुकीत फटका बसला. महाराष्ट्र आणि हरियानातील विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने केंद्रातील सरकार अटल बिहारी वाजपेयी सरकारप्रमाणे १३ महिन्यात पडण्याची शक्यता आहेत. त्यामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांना लाडकी बहिण योजना आठवली आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी लिहिलेल्या 'हॉस्पिटलचे बिल माफ करावे?' या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पत्रकार भवन येथे झाले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, माजी विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर, माजी सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे, मिलिंद गायकवाड आदी उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, २००४ ते २०१४ या काळात काँग्रेसची सत्ता असताना नागरिकांच्या हक्काचे कायदे केले गेले, त्याचे जागतिक पातळीवर कौतुक झाले. २००४ चा निकाल हा सोनिया गांधी यांचा चेहरा आणि त्यांच्या जाहीरनाम्यामुळे झाला होता. त्यामुळे मनमोहन सिंग यांच्याकडून जाहीरनामा पूर्ण करुण घेण्याची जबाबदारी सोनिया गांधी यांच्यावर होती.
माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातही राजीव गांधी जीवनदायी विमा योजना आणली, ही आताच्या आयुष्यमान भारत योजनेपेक्षा चांगली योजना होती. आताच्या सरकारकडून शिक्षण आणि आरोग्यावरचा खर्च कमी होत आहे हे चिंताजनक आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.
महायुती सरकारच्या विरोधात नागरिकांमध्ये संताप आहे. ठेकेदार हे सरकार चालवत आहेत. पैसे घेऊन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. लाडकी बहिण योजनेसाठी पैसे लागत असल्याने अन्य खात्यांना पैसे मिळत नाहीत यावरून मंत्रीमंडळाच्या बैठकीत अर्थमंत्री व कृषिमंत्र्यांची भांडण झाली. आरोग्य व्यवस्था, रुग्णाचे हक्क याचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या १८३ पेक्षा जास्त जागा निवडून येतील, असा दावा चव्हाण यांनी केला.
तर दिवाळीनंतर निवडणुका
महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या, जाहीरनामा तयार करण्याच्या बैठका सुरु झाल्या आहेत. विधानसभा निवडणूक दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीनंतरही होऊ शकते. दिवाळीनंतर झाल्यास लाडकी बहीण योजनेचा आणखी एक हप्ता महिलांना मिळू शकेल, असे चव्हाण यांनी सांगितले.