मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन राज्यातील विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. यावेळी, राज्यातील मराठीचा मुद्दा सातत्याने मांडणाऱ्या राज ठाकरेंनी बीएएमसचं शिक्षण घेणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांचा प्रश्नही मुख्यमंत्र्यांकडे मांडला होता. त्यावेळी, मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ दखल घेऊन महाराष्ट्रातील बीएमएमएसच्या विद्यार्थ्यांना गुडन्यूज दिली आहे. बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन (बीएएमएस) पदवी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी आता राज्यातून प्रवेश मिळणार आहे.
महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश मिळत नव्हता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासमवेत आज वर्षा निवासस्थानी झालेल्या एका बैठकीत मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांना आयुर्वेद विद्यार्थ्यांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी योग्य ती पाऊले उचलण्याचे सूचवले. त्यासाठी, पदव्युत्तर प्रवेश नियमांत आवश्यक ते बदल करून मान्यतेसाठी लगेच सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
राज्याच्या ८५% कोटा(शासकीय व खाजगी अनुदानित) तसेच ७०% कोटा (खाजगी विना अनुदानित) या कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आता संधी मिळणार आहे. त्यामुळे, गेल्या अनेक वर्षांपासूनची बीएएमएसच्या विद्यार्थ्यांची मागणीच आजच्या राजभेटीमुळे पूर्णत्वास आली असल्याने महाराष्ट्रातील या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या महत्त्वाच्या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, प्रवक्ते संदीप देशपांडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित आहेत. या भेटीमध्ये मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. यासाठी राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित आहेत. दरम्यान, उरण येथे यशश्री शिंदे या तरुणीची हत्या करण्यात आली आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, अशी मागणी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यासह राज्यभरातील महत्वाच्या घटकांवर या दोन नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.