Advertisement

कुंडलिक खांडेचा कोठडीतील मुक्काम वाढला

प्रजापत्र | Friday, 02/08/2024
बातमी शेअर करा

बीड दि.२ (प्रतिनिधी)-शिवसेना उपजिल्हाप्रमुखावरील हल्ल्यातील आरोपी कुंडलिक खांडे यांच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील जामीनावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्या जामीन अर्जावर आता ८ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असल्याने कुंडलिक खांडेंचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावरील हल्ला प्रकरणात शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. महिनाभरापूर्वी पोलिसांनी त्याला अटक केली होती.कुंडलिक खांडे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.बीडच्या जिल्हा न्यायालयाने खांडे याचा जामीन अर्ज फेटाळला होता.त्यानंतर कुंडलिक खांडे याने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.त्यावर न्या.एस.जी.मेहरे यांच्यासमोर शुक्रवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी 'आपल्याला पोलिसांकडून या प्रकरणाची कागदपत्रे आजच मिळाली' असल्याचे सांगत युक्तिवादाची वेळ मागून घेतला.त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणात पुढील सुनावणी ८ ऑगस्टला ठेवली आहे.
कुंडलिक खांडे यांच्या वतीने सुदर्शन सोळंके बाजू मांडत आहेत तर मूळ फिर्यादी असलेल्या ज्ञानेश्वर खांडे यांच्यावतीने विधिज्ञ हांगे बाजू मांडत आहेत. आता या प्रकरणात ८ ऑगस्टला सुनावणी होणार असल्याने कुंडलिक खांडे यांचा कारागृहातील मुक्काम आणखी काही दिवस वाढला आहे. 

Advertisement

Advertisement