बीड दि.०२ (प्रतिनिधी )- ग्रामपंचायतीतील वित्त आयोगातील कामे, रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात येणारी कामे ही कोणी केली पाहिजेत, याबाबत सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्याच्या दोन गटांमध्ये अनेक दिवसांपासून वाद होता. या वादाचे रुपांतर आज चक्क पंचायत समिती कार्यालयातच दोन गटात तुंबळ हाणामारीत झाले. नंतर अधिकार्यांनी धावाधाव करत दोषींवर गुन्हा दाखल करण्याऐवजी दोन्ही गटांची समजूत काढून आपल्या अंगावर हा वाद येणार नाही याची दक्षता घतेली.
तालुक्यातील बेलखंडी पाटोदा या ठिकाणी लाखो रुपयांची कामे मंजूर आहेत. यामध्ये प्रामुख्याने रोजगार हमी योजनेमार्फत रस्ता, पाणंद रस्ते, वित्त आयोगाची कामे कोणी केली पाहिजे याबाबत सत्ताधारी पक्षाच्याच दोन गटांमध्ये अनेक दिवसांपासून वाद धुमसत होता. हे दोन्ही गट आज पंचायत समितीच्या नरेगा कक्षात आमने-सामने आले. सुरुवातीला बाचाबाची होत नंतर याचे रुपांतर हाणामारीत झाले. याठिकाणी नरेगा कक्षाच्या प्रामुखासह इतर अधिकारीही उपस्थित होते. मात्र सर्वांनीच बघ्याची भूमिका घेतली. दोषींवर गुन्हा दाखल करण्याऐवजी दोन्ही गटांची समजूत काढत हा वाद आपल्या अंगावर येणार नाही, याची दक्षता घेतली. जर कार्यकर्ते कार्यालयातच मारामारी करत असतील तर गावपातळीवर काय होईल हे सांगायला नको. या हाणामारीला अधिकारी तर जबाबदार नाहीत ना, अशीही चर्चा सुरू होती.