राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित केली आहे. योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी सुरू करण्यात आलेले पोर्टल सातत्याने बंद पडत असल्याच्या तक्रारी सबंध महाराष्ट्रातून येत आहेत. यामुळे महिलावर्ग त्रस्त असतानाच आता रेशन वाटपात सर्व्हर डाऊन असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे महिलांच्या समस्या आणखीनच वाढल्या आहेत. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
शासनाची विविध कामे गतिमानपणे आणि पारदर्शक होण्यासाठी सर्व प्रकारची शासकीय कामे ऑनलाईन करण्याचा शासनाचा निर्णय आहे. मात्र अनेकदा कामे सहजपणे होण्यापेक्षा तांत्रिक अडचणींमुळे ते अधिकच किचकट होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.मागील काही दिवसांपासून मोफत धान्य वाटप करण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन सिस्टीमचा सर्व्हर डाउन आहे. यामुळे नागरिकांना स्वस्त धान्य दुकानांमध्ये बसून रेशन मिळण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.
शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागांतर्गत रेशन दुकानात लाभार्थां कुटुंबाना मोफत धान्य वितरण करण्यात येते. मात्र जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ई-पास मशिनच्या सर्व्हर डाउनमुळे राज्यातील शेकडो लाभार्थी स्वस्त धान्यापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे एकीकडे ही सर्व्हरची समस्या तातडीने दूर करावी अशी मागणी नागरिकांकडून होत असतानाच दुसरीकडे यावरून राजकारण देखील रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे या सोशल मीडिया पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले, सर्व्हर डाऊन असल्याने राज्यभरात रेशन वाटप थांबलंय. आठवडा उलटूनही सरकार याकडं लक्ष द्यायला तयार नाही. सरकारचं लक्ष केवळ ‘लाडक्या खुर्चीकडे’ आणि कमिशनकडे आहे. एकीकडे ज्या योजना अस्तित्वात आहेत त्या सुरळीतपणे चालवता येत नाहीत आणि दुसरीकडे मात्र नव्या योजनांची घोषणा करून जाहिरातबाजी करायची, असा या सरकारचा भोंगळ आणि भंपक कारभार सध्या सुरु आहे.
शासनाने POS मशिनच्या तांत्रिक अडचणी तत्काळ दूर करून धान्य वाटप सुरू करावं किंवा तांत्रिक अडचणी सुटत नसतील तर आधार प्रमाणिकरण करण्याची अट तात्पुरती शिथिल करून धान्य वाटप सुरू करण्याचे आदेश द्यावेत.