Advertisement

पोलीस अधिकारी,कर्मचारी 'संलग्न' करण्याला चाप

प्रजापत्र | Tuesday, 30/07/2024
बातमी शेअर करा

बीड दि. ३० (प्रतिनिधी ) : एखाद्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची बदली झाली तरी त्याला 'सोयीच्या ' ठिकाणी 'संलग्न ' करून बदली धोरणाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासणाऱ्या मानसिकतेला आता चाप लावला जाणार आहे. अशाप्रकारे कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्याला 'संलग्न ' करू नये आणि ज्यांना संलग्न केलेले असेल त्यांना ५ दिवसात बदलीच्या मूळ जागी पाठवावे असे आदेशच कायदा व सुव्यवस्था विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी सर्व पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

पोलीस दलात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियत कालावधीत बदल्या होतात. मात्र बदली झाल्यानंतरही काही अधिकारी, कर्मचारी वरिष्ठांसोबत असलेल्या जवळिकीचा फायदा उठवत बदलीच्या जागी रुजू न होता त्यांना सोयीच्या ठिकाणी 'संलग्न ' होतात. अशा प्रकारे कोणालाही 'संलग्न ' करण्याची तरतूद कायद्यात नसली तरी पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्तांच्या पातळीवर 'लाडक्यांना ' असे सर्रास संलग्न केले जाते. अनेक कर्मचारी तर बदलसह्या मूळ ठिकाणचे तोंडही न पाहता संल्गन ठिकाणी काम करूनच पुन्हा पुढच्या बदलीसाठी सज्ज होतात . आता सहा प्रकारांबद्दल कायदा सुव्यवस्थस विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी आक्षेप घेतला आहे. अशाप्रकारे 'संलग्न ' करणे बेकायदा असल्याने ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांना घटकप्रमुखानी 'संलग्न ' केले आहे, त्यांना तात्काळ मूळ जागी पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी अप्पर पोलीस महासंचालकांनी घटकप्रमुखांना ५ दिवसाची मुदत दिली आहे. त्यामुळे 'संलग्नतेचा ' आधार घेत वर्षानुवर्षे एकाच शहरात किंवा शाखेत ठाण मांडून बसलेल्या 'जहागीरदारांना ' आता हालावे  लागणार आहे.

---

बीड जिल्ह्यावर काय होणार परिणाम ?

या आदेशाचा बीड जिल्ह्यात मोठा परिणाम होणार आहे. बीड जिल्हा पोलीस दलातील अनेक कर्मचारी ज्यांची बीड शहराबाहेर दूरच्या ठाण्यात बदली झालेली आहे, ते त्या ठिकाणी न जाता नियंत्रण कक्ष, किंवा शहरातील ठाणे किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयातील कोणत्यातरी शाखेत संलग्न होऊन जिल्हा मुख्यालय सोडायला तयार नाहीत. तर अनेकांची वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नियुक्ती असताना त्यांनी एलसीबीमध्ये संलग्नता मिळवून नोकरी सुरु ठेवली आहे. संलग्नतेच्या नव्या आदेशांचे पालन करायचे म्हटले तर वर्षानुवर्षे शहरातच वेगवेगळता ठिकाणी ठाण मांडलेल्या अनेकांना आता इतर ठिकाणी जावे लागेल.

Advertisement

Advertisement