Advertisement

मनुने जिंकलं दुसरं ब्राँझ!

प्रजापत्र | Tuesday, 30/07/2024
बातमी शेअर करा

भारताची नेमबाज मनु भाकर हिने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये इतिहास रचला आणि नेमबाजीत पदक जिंकणारी देशातील पहिली भारतीय महिला ठरली. तिने महिलांच्या वैयक्तिक १० मीटर एअर पिस्तुलच्या अंतिम फेरीत कांस्यपदक पटकावले. आज मनु मोठा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली होती. ती सरबजोत सिंग याच्यासह मिश्र सांघिक १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्यपदकासाठी खेळली. दक्षिण कोरियाच्या खेळाडूंचे आव्हान मोडून मनु व सरबजोत पदक जिंकले. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी स्वातंत्र्यानंतरची ती पहिली भारतीय खेळाडू ठरली.

कांस्यपदकाच्या लढतीत मनु भाकर आणि सरबजोत सिंग यांचा सामना ओ ये जिन आणि ली वोंहो या कोरियन जोडीशी होईल. मनु आणि सरबजोत यांनी क्वालिफायरमध्ये एकत्रितपणे ५८० गुण नोंदवून तिसरे स्थान पटकावले तर कोरियन जोडीने ५७९ गुणांसह चौथ्या स्थानावर शिक्कामोर्तब केले होते.

 

 

कांस्यपदकाच्या लढतीत चुरस...
कोरियन खेळाडूने पहिल्या शॉट्समध्ये २ गुण घेताना भारतीय जोडीवर दडपण वाढवले. पण, मनुने १०.७ व सरबजोतने १०.५ गुण घेत मॅच २-२ अशी बरोबरीत आणली. त्यानंतर सलग चार सीरिजमध्ये प्रत्येकी २ गुण घेताना भारतीय जोडीने ८-२ अशी विजयी आघाडी घेतली. सहाव्या सीरिजमध्ये कोरियन जोडीने पुनरागमन करताना पिछाडी ४-८ अशी कमी केली, परंतु सातवी सीरिज भारतीय जोडीने जिंकली. ८व्या प्रयत्नात पुन्हा कोरियन खेळाडू २ गुण घेत मॅच ६-१० अस अटीतटीचा आणला. पण, भारतीय जोडी पदकावरील पकड मजबूत करण्याच्या निर्धारानेच खेळली आणि ९व्या शॉट्समध्ये २ गुण घेताना आघाडी १२-६ अशी भक्कम केली. १०व्या शॉट्समध्ये पुन्हा दोन गुण घेतले. कोरियन हार मानणाऱ्यांपैकी नव्हते आणि त्यांनी ११व्या व १२ व्या शॉट्समध्ये २ गुण घेतले. पण, भारताचा १४-१० असा विजय पक्का झाला. १३व्या सीरिजमध्ये २ गुण घेत भारताने १६-१० गुणासह कांस्यपदक निश्चित केले.

 

 

थोडक्यात हुकली पदकं...
सोमवारी रमिता जिंदाल आणि अर्जुन बबुता या नेमबाजांना पदक जिंकण्याची संधी होती, परंतु अगदी थोडक्यात त्यांचे पदक हुकले. रमिता ०.३ गुणांच्या फकराने पदक शर्यतीतून बाहेर पडली आणि ७व्या स्थानावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे अर्जुनला चौथ्या क्रमांकासह स्पर्धेतून माघारी पडावे लागले. अगदी थोडक्यात त्याचे कांस्यपदक हुकले.

 

 

१९०० नंतर थेट २०२४
एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी स्वतंत्र भारतातील मनु ही पहिली खेळाडू ठरली. १९००च्या खेळांमध्ये जेव्हा भारत ब्रिटिश राजवटीत होता तेव्हा नॉर्मन प्रिचर्ड यांनी ॲथलेटिक्समध्ये दोन रौप्य पदके जिंकली होती. प्रिचार्डनंतर एकाही भारतीय खेळाडूला एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकता आलेली नाहीत. सुशील कुमार ( कुस्ती) व पी व्ही सिंधू ( बॅडमिंटन ) यांनी भारतासाठी दोन वेगवेगळ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकले आहे.

 

Advertisement

Advertisement