येत्या ९ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही (प्रहार संघटना) मोर्चा काढणार आहोत. त्यातून आम्ही आमची ताकद दाखवू. त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. आम्ही अजूनही महायुतीमध्येच आहोत. पण, आम्ही आमची स्वतःची आघाडी करण्याचा विचार करतोय.मनोज जरांगे पाटील यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा आमचा विचार आहे, असे सांगून आमदार बच्चू कडू यांनी महायुतीला सोडण्याचा विचार केल्याचे दिसून येते.
माजी मंत्री बच्चू कडू हे आज उमरगा, लातूरच्या दौऱ्यावर आहेत. लातूरला रवाना होण्यापूर्वी सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महायुतीला सोडण्याची भाषा करतानाच आम्ही मुद्यावर निवडणूक लढतोय. मनोज जरांगे पाटील हेही मुद्यावर बोलत आहेत. त्यामुळे त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे जाऊ, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले, आम्हाला तिसरी आघाडी म्हणू नका. आम्हीच पाहिली आघाडी आहोत. आमची आघाडी ही मूळ शेतकऱ्यांची आघाडी आहे. ज्या योजना काँग्रेसने करण्याचा प्रयत्न केला, तेच जरं युती करणार असेल तर त्याला काय अर्थ आहे.आमचे १६ मुद्दे आहेत ते जर मान्य होतं असतील तर कोणीही मान्य करेल त्या आघाडी अथवा युतीला आमचा पाठिंबा असेल. आम्ही मुद्यावर लढतोय आम्हाला विधानसेभेची अपेक्षा नाही. मुद्दा मान्य झाला तर ज्यांनी मान्य केला त्यांना आम्ही पाठिंबा देणार आहोत, असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणायला आमची काही हरकत नाही. पण, योजना कोणासाठी हे पहिलं पाहिजे, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होण्याबाबतही बच्चू कडू यांनी आपले मत नोंदविले आहे.गुन्हा हा राजकीय कार्यकर्त्यांचा अलंकार आहे. तो कार्यकर्त्यांनी अभिमानाने स्वीकारला पाहिजे आणि मिरविला पाहिजे. माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत. आंदोलन करताना गुन्हे दाखल होतात, ते मोठ्या मनाने स्वीकारले पाहिजेत, असेही त्यांनी म्हटले आहे.