Advertisement

राष्ट्रपतींकडून ६ राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या

प्रजापत्र | Sunday, 28/07/2024
बातमी शेअर करा

 दिल्ली- राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी सहा राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती आणि तीन राज्यपालांच्या बदलीची घोषणा केली. यानुसार महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी.पी. राधाकृष्णन यांची बदली करण्यात आली आहे. अगोदर ते झारखंडचे राज्यपाल होते. महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. 

 

राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या नवीन राज्यपालांमध्ये महाराष्ट्रा भाजपचे प्रभारी पद सांभाळलेले ओम माथूर यांची सिक्कीमचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. जिष्णु देव वर्मा यांची तेलंगणाचे राज्यपाल, संतोष कुमार गंगवार यांची झारखंडचे राज्यपाल, रामेन डेका यांची छत्तीसगडचे राज्यपाल आणि सी. एच. विजयशंकर यांची मेघालयचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. 

 

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी.पी. राधाकृष्णन

राष्ट्रपतींनी बदली केलेल्या राज्यपालांमध्ये सी.पी. राधाकृष्णन तेलंगणाचा अतिरिक्त कार्यभार असलेले झारखंडचे राज्यपाल यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.  गुलाब चंद कटारिया, आसामचे राज्यपाल होते त्यांची आता पंजाबचे राज्यपाल म्हणून नियुक्ती आणि चंदीगडच्या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे. तर लक्ष्मण प्रसाद आचार्य, सिक्कीमचे राज्यपाल होते, आता त्यांना आसामचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले गेले आणि मणिपूरच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला. 

Advertisement

Advertisement