मुंबई- दोन पराभवानंतर पंकजा मुंडे पुन्हा एकदा आमदार झाल्या असून आज त्यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. २०१९ विधानसभेत आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा अगदी थोडक्यात पराभव झाल्यानंतर आज त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी शपथ घेतली. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांचा आज शपथविधी झाला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. सकाळी विधान परिषदेच्या विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी पार पडला आहे.
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपने पुन्हा संधी दिली. पंकजा मुंडे यांच्यासह योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, भावना गवळी, कृपाल तुमाने, शिवाजीराव गरजे, राजेश विटेकर, मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव या नवनिर्वाचित सदस्यांचा ही शपथविधी पार पडला.