Advertisement

संपादकीय अग्रलेख- आरोपांचा कलगीतुरा !

प्रजापत्र | Friday, 26/07/2024
बातमी शेअर करा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील आरोप प्रत्यारोपांनी महाराष्ट्राच्या एकूणच राजकीय संस्कृतीला काळोखाची किनार लावली जात आहे. अनिल देशमुख यांनी केलेले वक्तव्य आणि त्यांचा हवाला देत शाम मानव यांच्या गौप्यस्फोटानंतर आता राज्याचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस ‘ मी कोणाला सोडत नसतो’ असा इशारा देत असतील आणि त्यांच्याकडे खरोखरच ध्वनीफिती किंवा आणखी काही असेल तर नेमकी वाट कशाची पाहत आहेत?

महाराष्ट्राला देशाच्या इतर राज्याच्या तुलनेत एक वेगळी परंपरा राहीलेली होती. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक चढ उतार आले . पण सुडाचे राजकारण हा महाराष्ट्राचा स्थायीभाव कधीच नव्हता. मागच्या दहा वर्षात महाराष्ट्राचे हे चित्र अत्यंत गतीने ढासळताना पहायला मिळत आहे. भाजपाचा राज्यात जस जसा राजकीय उत्कर्ष होत गेला तस तसा राजकीय नैतिकतेचा र्‍हास होतानाचे चित्र राज्याला पहायला मिळत आहे. संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने बोलताना भान ठेवणे अपेक्षित असते . एखाद्यावर आरोप करताना किंवा कोणतीही विधाने करताना संवैधानिक पदावरील व्यक्तीच विचार न करता बोलणार असेल तर अराजकाकडे वाटचाल व्हायला वेळ लागत नसतो.
मागच्या दशकभरात केंद्रीय सत्तेचा वापर करून भाजपाने विरोधी पक्षातील नेत्यांना कसे कसे अडकवले याचे किस्से देशभरात कमी नाहीत. ईडी, सीबीआय, आयकर विभाग अशांचा वापर करून विरोधकांना भाजपात येण्यासाठी कसे मजबुर केले गेले हे देखील देशाने पाहीले आहे. अशाही परिस्थितीत काही नेते दबावाला न झुगारता कायम राहीले . अनिल देशमुख हे त्यापैकी एक . परमवीर सिंग नावाचा कोणी एक पोलिस आयुक्त काहीतरी आरोप करतो आणि राज्याच्या गृहमंत्र्यालाच जेलमध्ये जावे लागते हे सारे तसे आक्रीत म्हणावे असेच. पण महाराष्ट्रात ते घडले. या मागे कोण कोणत्या यंत्रणांचा हात होता हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्या अनिल देशमुखांकरवी उध्दव ठाकरेंपासून पवारांपर्यंत अनेकांना अडचणीत आणण्याचा कसा डाव आखला होता याच्या चर्चा आता राज्याच्या राजकारणात सुरू आहेत. शाम मानव यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर अनिल देशमुखही त्याच आशयाचे बोलले, आणि या सार्‍या षडयंत्राची सुई पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गेली.

 

 

मागच्या दशकभरात राज्याच्या राजकारणात जे काही घडत गेले , त्याचे श्रेय असेल किंवा अपश्रेय, प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच जाते. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला सुडाच्या पटरीवर नेण्याचे धोरण सुरू करणारांमध्ये फडणवीस एक प्रमुख आहेत असे म्हणण्याची वेळ आली आहे. अनिल देशमुख यांच्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा ‘माझ्याकडे ध्वनी फिती आहेत, वेळ आल्यावर मी त्या जाहीर करील. मी कोणाला सोडत नसतो’ असे विधान केले. खरे तर महाराष्ट्राच्याच काय , कोणत्याच राज्याच्या गृहमंत्र्याला ही भाषा शोभत नाही. गृहमंत्री कशाला अगदी कोणत्याही लोकप्रतिनिधीला देखील अशी भाषा शोभत नसते. महाराष्ट्राच्या संस्कृतीत ‘बघून घेईल’ ही भाषा सभ्यतेची मानली जात नाही. तरीही देवेंद्र फडणवीस गृहमंत्री पदावरून असे काहीतरी बोलत राहतात. देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे जर खरोखरच त्यांच्याकडे अनिल देशमुखांच्या संदर्भाने काही ध्वनीफिती आहेत किंवा एखाद्या मोठ्या षडयंत्राचे पुरावे फडणवीस यांच्याकडे आहेत तर मग राज्याचे हे कर्तव्यदक्ष गृहमंत्री नेमकी कशाची वाट पाहत आहेत? त्यांच्याकडे सारे पोलिस खाते आहे , फोन टॅपिंग प्रकरणात महारत मिळविलेल्या पोलिस महासंचालक आहेत. मग अशावेळी नेमकी कोणती वेळ यायची वाट फडणवीसांना पहायची आहे? यापूर्वी देखील अनेक प्रकरणात फडणवीसांनी मोठ मोठ्या घोषणा केल्या होत्या. अगदी आज ज्या अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून सत्तेच्या पंगतीत देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत त्या अजित पवारांविरूध्द सुध्दा फडणवीसांकडे गाडीभर पुरावे होते, त्याचे पुन्हा काय झाले?हे देखील कोणाला माहिती नाही. आता जर खरोखर अनिल देशमुखांची कोणती ध्वनीफित असेलच तर ती राज्यापासून लपवून देवेंद्र फडणवीस मंत्रीपदाच्या घेतलेल्या संवैधानिक शपथेसोबत प्रतारणा तर करीत नाहीत ना? आणि असे काही नसेलच तर मग राज्याचे विकृत चित्र ते का निर्माण करीत आहेत.

Advertisement

Advertisement