Advertisement

 १ ऑगस्टपासून राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा

प्रजापत्र | Thursday, 25/07/2024
बातमी शेअर करा

मुंबई - आगामी महाराष्ट्र विधानसभेच्या दृष्टीने मनसेनं स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात २२५-२५० जागा लढवणार असं जाहीर केले आहे. वांद्र येथे झालेल्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यात राज बोलत होते. 

 

राज ठाकरे यांनी सांगितले की, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मला मनसेची लोक काहीही करून सत्तेत बसवायची आहेत. अनेकजण हसतील पण ही गोष्ट घडणार म्हणजे घडणार. सगळे आम्ही तयारीला लागलेत. युतीचा विचार मनात आणू नका, २२५ ते २५० जागा मनसे लढवणार आहोत. सगळ्या गोष्टी तपासल्या जाणार, पक्षांतर्गत टीम जिल्ह्यात येतील, तुमच्याशी बोलतील. माझ्याकडे जो काही सर्व्हे येईल. त्यानंतर जवळपास १ ऑगस्टपासून मी महाराष्ट्राचा दौरा करतोय. जिल्हाजिल्ह्यात भेटीगाठी होतील. पावसामुळे मेळावे घ्यावे की नाही हे ठरवू. पदाधिकाऱ्यांशी, महाराष्ट्र सैनिकांशी संवाद होईलच असं त्यांनी सांगितले. 

 

तसेच मी पक्षातील ४-५ जणांची टीम केली, हे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांना माहिती नसेल. ते तुमच्या जिल्ह्यात, तालुक्यात येऊन गेले, तिथे त्यांचा सर्व्हे झाला. त्यांनी सगळ्यांची विचारपूस केली, पत्रकारांशी, स्थानिकांशी बोलले त्यांचा पहिला अहवाल माझ्याकडे आले. ते पुन्हा तुमच्याकडे येतील, काय नीट परिस्थिती आहे ते समजून सांगा. काय गणिते घडू शकते, विविध गोष्टींचे आकलन करा. विचार करा.निवडून येण्याची क्षमता असणारे, तयारी असणारे अशांनाच तिकीट दिलं जाईल. उमेदवारी दिली म्हणजे मी पैसे काढायला मोकळा अशांना तिकीट दिली जाणार नाही.जे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आहेत त्यांनी या टीमला प्रामाणिक माहिती द्या. तुम्ही दिलेली माहितीही तपासली जाणार आहे अशी सूचनाही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिली. 

 

दरम्यान, राज्यात पाऊस पडतोय, जिथं पूर आलेत, घरात पाणी शिरलं तिथे ज्या ज्या गोष्टी शक्य असतील तिथे लोकांची मदत करा. या परिस्थितीतून लोकांना बाहेर काढा. महाराष्ट्रातील मूळ प्रश्न आहेत त्यावरच लक्ष द्या. हेच तुमचे या विधानसभा निवडणुकीचं कॅम्पेन असलं पाहिजे, प्रचार असला पाहिजे. एकमेकांवर फक्त शिव्या द्यायच्या, लोकांचं लक्ष विचलित करायचे, यातून निवडणुका करायच्या यातून हाताला काही लागणार नाही असंही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितलं. 
 

Advertisement

Advertisement