Advertisement

संपादकीय अग्रलेख- शहांची बौद्धिक दिवाळखोरी

प्रजापत्र | Tuesday, 23/07/2024
बातमी शेअर करा

         आपण काहीही बोललो तरी लोक टाळ्या वाजवितात असा अहंकार एकदा आला की मग बोलतानाचा ताळतंत्र कसा सुटतो, याचे उत्तम उदाहरण म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पाहता येईल. संवैधानिक पदांवरून बोलताना आपण काय बोलत आहोत याचे भान ठेवणे आवश्यक असल्याचा संकेत जिथे स्वतः पंतप्रधानच पाळत नाहीत, तेथे त्यांच्या मंत्र्यांकडून संवैधानिक पदांच्या पावित्र्याची अपेक्षा करणे गैरच, पण त्या मंत्र्यांनी, त्यातही अमित शहांसारख्या 'महाशक्तीने' तरी किमान महाराष्ट्रात येऊन इतर कोणाच्या नाही, 'अभ्यासोनि वर्तावे' या संत विचाराचा शरद पवारांबद्दल बोलण्यापूर्वी करायला हवा होता.
 

 

भाजपच्या अधिवेशनासाठी महाराष्ट्रात आलेले अमित शहा हे खरेतर भाजपच्या कार्यकर्त्यांना 'अजित पवारांना सोबत घेतल्याच्या कृतीचे समर्थन कसे करायचे, याबद्दलचे काही बौद्धिक देतील असे अपेक्षिले जात होते. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपला जो फटका बसला त्यामागे अजित पवारांसोबतचा 'असंगाशी संग ' हे महत्वाचे कारण होते असाच सार्वत्रिक सूर भाजपमध्ये आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना अमित शहांकडून याविषयावर बौद्धिकाची अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात घडले ते उलटेच .
     अजित पवारांसोबतच्या संबंधांवर अमित शहा बोललेच नाहीत. उलट त्यांनी टीका केली ती शरद पवारांवर. अर्थात महाराष्ट्रात राजकीय मायलेज घ्यायचे तर त्यासाठी शरद  पवारांवरच बोलावे लागते हा मागच्या पाच दशकांहून अधिक काळाचा शिरस्ता आहेच, अमित शहा तरी त्याला अपवाद कसे ठरतील? आणि असेही भाजपला महाराष्ट्रात जे राजकारण करायचे आहे, किंवा महाराष्ट्रावर जीं राजकीय पकड मिळवायची आहे, त्यामधला मोठा अडथळा अर्थातच शरद पवारच आहेत याची भाजपला पूर्ण जाणीव आहे, आणि म्हणूनच लोकसभा निवडणुकीतही भाजपचे चंद्रकांत पाटलांसारखे नेते थेट बारामतीमध्ये जाऊन 'आम्हाला शरद पवारांचे राजकारण संपवायचे आहे' अशी भाषा करताना दिसत होते, त्याचे परिणाम काय असतात हे बारामतीकरांनी दाखवून दिले आहेच, पण आता शरद पवारांचे राजकारण संपवायचे तर त्यांना बदनाम करा असे धोरण भाजपने स्वीकारले असावे. राजकारणात कोणी कोणाला विरोध करावा याबद्दल कोणाचा आक्षेप असण्याचे काही कारण नाही, त्यामुळे अमित शहा शरद पवारांना विरोध करत असतील तर त्यातही कोणाला वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही, प्रश्न आहे तो इतकाच, की हा विरोध करताना अमित शाह नेमके काय बोलत आहेत ?
     

 

भाजपच्या अधिवेशनात बोलताना अमित शहांनी शरद पवारांना 'भ्रष्टाचार का सरगणा' हा शब्द वापरला, शरद पवारांनी भ्रष्टाचाराचे कसे 'इन्स्टिट्यूटलायजेशन' केले यावरही अमित शहा बरेच काही बोलले . आता अमित शहा जे बोलले ते खरे आहे असे काही काळासाठी मान्य करू, पण प्रश्न निर्माण होतो तो हाच, की हेच शरद पवार मागच्या दहा वर्षांपासून विरोधी पक्षात आहेत. आणि भाजपने, नरेंद्र मोदींनी 'ना खाऊंगा, ना खाने दूंगा' म्हणत विरोधी पक्षातील अनेक नेत्यांचा  मग ते केजरीवाल असतील किंवा आणखी कोणी, अगदी आत्ताचे एनडीएमधील सहकारी असलेले चंद्राबाबू नायडू, अशा अनेकांचा कथित भ्रष्टाचार ईडी, सीबीआय, आयकर विभाग आदींच्या माध्यमातून खणून काढला, त्या नेत्यांना जेलमध्ये पाठविले (आता यातील किती प्रकरणात शिक्षा झाली किंवा होईल, हा भाग वेगळा) , भ्रष्टाचाऱ्यांना धडकी बसेल असे काम केले, ते इतके की भाजपला आपली शुद्धीकरणाची वॉशिंग मशीन अगदी दिवसरात्र चालवावी लागत आहे, मग भाजपच्या या कर्तव्यदक्ष यंत्रणांच्या रडारवर शरद पवार अजून कसे आले नाहीत? अमित शहा म्हणतात तसे जर शरद पवार  'भ्रष्टाचार का सरगणा' असतील तर आतापर्यंत त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? नरेंद्र मोदी हे शरद पवारांना दहा वर्षापूर्वी आपला राजकीय गुरु मानायचे, हा इतिहास झाला म्हणून एकवेळ ते सोडून देऊ, पण काही वर्षांपूर्वी मोदींच्याच सरकारने (एनडीए नाही तर भाजपच्या स्वबळावरच्या सरकारने) याच शरद पवारांना 'पद्मविभूषण' दिला, तो काय म्हणून? हा त्यांच्या कथित भ्रष्टाचाराचा गौरव होता का? याच शरद पवारांनी आपल्यासोबत यावे यासाठी भाजपवाले मागच्या दहावर्षात कितीवेळा हपापलेले होते? मोदींपासून भाजपचे नेते शरद पवारांच्या बारामतीत, मोदीबागेत ज्या प्रदक्षिणा घालायचे ते काय 'भ्रष्टाचाराचे मॉडेल' अभ्यासण्यासाठीच का? हे आणि असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहेत. अमित शहा यांनी शरद पवारांवर टीका केली म्हणून त्याला उत्तर देण्यासाठी हा लेखनप्रपंच नाही, शरद पवार त्याला काय ते उत्तर देतील, मात्र केवळ राजकारणासाठी मागचा इतिहास न पाहता काही तरी बरळणे याला समर्थांच्या, हो समर्थ रामदासांच्या भाषेत (भाजपवाल्यांना सध्या संत परंपरेत हेच जास्त जवळचे आणि 'आपले' वाटतात ) मुर्खासारखे 'बरळणे' म्हणतात . समर्थानी अशा सर्वांना 'अभ्यासोनि वर्तावे' चा सल्ला दिलेला आहेच. आता अमित शहांनी किमान महाराष्ट्रात येताना तरी येथील नेतृत्वाचा, त्यांना आपण यापूर्वी काय म्हणालो होतो, यापूर्वी आपण कोणाकोणाची काय शब्दात गौरव केला होता, याचा तरी अभ्यास करावा. बाकी भाजपला भ्रष्टाचारावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का असले बाळबोध प्रश्न या ठिकाणी निर्माण करण्याचे काहीच कारण नाही, त्याचे उत्तर अशोक चव्हांपासून ते खुद्द अजित पवारांपर्यंत अनेकांना 'पवित्र ' करून घेऊन भाजपने दिलेले आहेच, पण किमान कोणत्याही ज्येष्ठ राजकारण्याबद्दल बोलताना केवळ भापीभापित बरळल्यावर त्याचे कसे हसू होते, याचे उदाहरण अमित शहा ठरत आहेत, आता आपले आणखी किती हसू करून घ्यायचे ते त्यांनीच ठरवावे, बाकी महाराष्ट्रातील जनता सुजाण आहे, या जनतेला शरद पवारांची पूर्ण माहिती आहे आणि अमित शहांचे 'तडीपारी' कर्तृत्व देखील .
 

Advertisement

Advertisement