पुणे - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रमुख आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेले रविकांत तुपकर यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. याप्रकरणी निर्णय घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून समिती नेमण्यात आली होती. त्या समितीच्या सदस्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार रविकांत तुपकर यांच्याशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा काहीही संबंध नाही असा निर्णय जाहीर सोमवारी (दि. २२) पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला. यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सतीश काकडे, घनशाम चौधरी, विठ्ठ्ल मोरे, अमरसिंह कदम, अनिल पवार उपस्थित होते.
यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या विरोधात आरोप करणारे रविकांत तुपकर यांनी २०१९ ची विधानसभा तोंडावर असताना संघटना सोडून गेले ते का गेले याचे उत्तर आम्हाला मिळाले नाही. पण एक महिन्याचा कालावधी गेल्यानंतर परत ते संघटनेमध्ये आले. तेव्हा संघटनेमध्ये प्रवेश घेताना तुम्हाला पद दिले जाणार नाही, एक सामान्य कार्यकर्त्यासारखे काही दिवस तुम्हाला काम करावे लागेल. या अटीवर संघटनेने त्यांना परत घेतले. त्यानंतर ते संघटनेच्या बैठकींना, ऊस परिषदांना उपस्थित राहिलेले नाही. वारंवार त्यांना सूचना देऊन सुद्धा त्यांनी मौन बाळगणे स्वीकारले.
संघटनेने चार वर्षे वाट पाहिली मात्र आता वाट पाहू शकत नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचा आजपासून रविकांत तुपकर यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही ते संबंध संघटनेने तुमच्यासोबत संपलेले आहेत. तसेच मी चळवळीमध्ये आहे असं म्हणतात आणि संघटनेच्या नेतृत्वावर सातत्याने प्रसार मीडियातून आघात करत असताना बघायला मिळाले. तसेच अलीकडे ते स्वाभिमानी संघटना ही माझी संघटना आहे असा संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोपही काकडे यांनी केला आहे.