Advertisement

संपादकीय अग्रलेख- मित्र पक्षांची कोंडी

प्रजापत्र | Monday, 22/07/2024
बातमी शेअर करा

राज्यातील महायुतीमध्ये सारे काही आलबेल असल्याचे वारंवारं सांगितले जात असले आणि भाजपाकडून आगामी विधानसभा निवडणुका महायुती म्हणूनच लढण्याचे स्पष्ट केले जात असले तरी एकंदर भाजप पक्षातच मित्र पक्षाबद्दल जी नाराजी आहे त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील भाजपाच्या मित्र पक्षांची कोंडी होऊ शकते अशी परिस्थिती आहे.

 

महाराष्ट्रात येत्या तीन महिन्यानी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत एनडीएला त्यातही भाजपाला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर फटका बसला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने स्वत:ची अब्रू राखली तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा निवडणुकीत पुरती शोभा झाली होती. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकासाठी आतापासूनच रणनिती निश्‍चित केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत जागांचे वाटप आणि त्यानंतर उमेदवारी जाहीर करण्यात उशीर झाला आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पुरेसे नियोजन करता आले नाही, भाजपाला त्यांच्या मित्र पक्षांच्या नेत्यांनी साथ दिली नाही अशी ओरड भाजपाच्या प्रत्येक बैठकीत होत आहे. भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील प्रभारी बदलले. त्यांच्यासमोरही भाजपाच्या नेत्या, कार्यकर्त्यांनी मित्रपक्षांबद्दलची नाराजीच बोलून दाखविली.अर्थात भाजपाने अधिकृत पातळीवर अशी काही नाराजी असल्याचे मान्य केलेले नाही. कोणताच पक्ष तसे ते मान्य करतही नसतो. परंतु महाराष्ट्रात भाजपाचे जे काही नियोजन सुरू आहे ते पाहता आज ‘महायुती’म्हणून लढण्याची तयारी दाखविणारा भाजप, उद्या खरोखर सर्व मित्र पक्षांना सन्मानजनकरित्या सोबत घेईल का? हा मोठा प्रश्‍न आहे.

 

 

भाजपामध्ये जो सूर आज लावला जात आहे. त्यानुसार भाजपाने स्वत: दीडशेपेक्षा अधिक जागा लढवाव्यात हिच या पक्षातल्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची भावना आहे. मुळात मागच्या काही काळात भाजपाने महाराष्ट्रात देखील स्वत:च्या ताकदीचा फुगा इतका फुगविला आणि प्रत्येक मतदारसंघात ‘शतप्रतिशत’ची जी हवा भरली होती त्यामुळे आता प्रत्येक मतदारसंघातील नेत्यांना आणि कार्यकर्त्याला आपल्या मतदारसंघात भाजपचाच उमेदवार असावा असे वाटणे सहाजिक आहे. त्यातही भाजपाच्या सर्वाधिक जागा असताना एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करायचे होते तर मग उध्दव ठाकरे काय वाईट होते? असाही मतप्रवाह भाजपामध्ये आहेच. त्यामुळे भविष्याच्या राजकारणासाठी तरी भाजपाने सर्वाधिक जागा लढवाव्यात आणि राज्याची सत्ता खर्‍या अर्थाने भाजपाची रहावी ही राज्यातील भाजपीयींची इच्छा आहे. एकनाथ शिंदेच्या बाबतीत फारसे कोणाला काही वाटत नाही. मात्र अजित पवारांना पचवणे भाजपाच्या गल्लीपासून अगदी मुंबईपर्यंतच्या सर्वच नेत्या-कार्यकर्त्यांना अडचणीचे आहे. अमित शहा किंवा नरेंद्र मोदी काहीही म्हणत असले तरी पवारांच्या संगतीचे समर्थन गाव पातळीवर करता येत नाही ही भाजपाची अडचण आहे. आणि म्हणूनच आता भाजपाने स्वत:कडे १५० ते १६०  जागा ठेवल्या तर आपोआपच महायुतीमध्ये बिघाडी होईल अशी परिस्थिती आहे.
भाजपा खालोखाल महायुतीत एकनाथ शिंदेंना अधिकचे महत्व असणे सहाजिक आहे. एकतर लोकसभा निवडणुकीत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षाही एकनाथ शिंदेंचा ‘स्ट्राईक रेट’ उजवा आहे. त्यामुळे भाजप १५० ते १६० जागा घेणार असेल आणि एकनाथ शिंदे किमान ८० जागा मागणार असतील तर अजित पवारांच्या वाट्याला उरणार काय? लोकसभा निवडणुकीतही अजित पवारांना चार जागा देण्यात आल्या होत्या. आता विधानसभेतही ४०-५० जागांवर अजित पवारांची बोळवण केली जाणार असेल तर त्यांना हे मान्य होईल का? मग अशा परिस्थितीत महायुती खरोखर टिकेल का? हे प्रश्‍न आहेतच.

Advertisement

Advertisement