Advertisement

 मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर दिसला ३ वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो

प्रजापत्र | Saturday, 20/07/2024
बातमी शेअर करा

मुंबई - सरकार कोणतही असो आपल्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळण्याआधीच त्या योजनेची जाहीरातबाजी मोठ्या प्रमाणात करतात. अशा जाहिरातींवरुन सरकारकडून हजारो कोटींचा निधी उधळला जातो. तर अनेकदा अशा जाहीराती वादात देखील अडकतात. सध्या अशाच एका जाहिरातीवरुन शिंदे सरकारची कोंडी झाली आहे.

 

 

कारण शिंदे सरकारने पावसाळी अधिवेशनात "आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन" ही नवी योजना सुरु केली आहे. या योजनेची जाहिरातबाजी देखील सरकारकडून मोठ्या प्रमाणात सुरु आहे.मात्र या योजनेच्या जाहिरात फलकावर लावण्यात आलेल्या व्यक्तीचा फोटो पाहून त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. कारण जाहिरातीमध्ये ज्या व्यक्तीचा फोटो लावण्यात आला आहे. ती व्यक्ती गेले तीन वर्षापासून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

 

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वरूडे येथील ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे मागील तीन वर्षापासून बेपत्ता आहेत. त्यांच्या कुटुंबाने त्यांचा शोध घेतला परंतु ज्ञानेश्वर तांबे यांचा शोध लागला नाही. अखेरीस तीन वर्षानंतर मुख्यमंत्र्यांच्या "आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन" या जाहिरात फलकावर ज्ञानेश्वर तांबे यांचा फोटो दिसल्याने कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.शिवाय जेष्ठांना धार्मिक स्थळाचं दर्शन जाऊद्या, आम्हाला आमच्या वडिलांचे दर्शन घडवा अशी मागणी तांबे कुटुंबीयांनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे  केली आहे. या प्रकरणावर बोलताना ज्ञानेश्वर तांबे यांचे पुत्र भरत तांबेंनी सांगितलं, "आमचे वडील मागील तीन वर्षापासून हरवले होते.आम्ही त्यांचा सर्वत्र शोध घेत होतो. परंतु ते सापडत नव्हते, अशातच त्यांचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या एका जाहिराती फलकावर दिसून आल्याने आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. मुख्यमंत्री ज्याप्रमाणे जेष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळाचे दर्शन घडवणार आहेत, त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या वडिलांचे दर्शन घडून द्यावे." अशी मागणी भरत तांबे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Advertisement

Advertisement