'शहाण्याला शब्दाचा मार' असं पूर्वी सांगितलं जायचं, पण हे कदाचित राजकारण क्षेत्राला लागू होत नसावं. त्यामुळेच राजकीय व्यक्तींना कोणी कितीही सल्ले दिले तरी ते फारसे गांभीर्याने घेतले जात नाहीत. असे सल्ले दुर्लक्षिण्याकडे सध्या भाजपचा कल अधिक आहे. जिथे सरसंघचालकांच्या कानपिचक्यांचा देखील भाजपवर परिणाम होतांना दिसत नाही, तिथे 'विवेक' मधून झालेली टीका गांभीर्याने घेण्याइतका राजकीय विवेक या पक्षात उरला आहे का?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाचे कान टोचल्यानंतर संघाशी संबंधित मासिकांनीही भाजपाच्या सुमार कामगिरीचे विश्लेषण करतांना पक्षावर बरीच बोचरी टीका केली आहे. संघाचे मुखपत्र मानल्या जाणाऱ्या ‘ऑर्गनायझर’ मध्ये याआधीही भाजपाच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले होते. त्यानंतर आता ‘विवेक’ या संघाशी संबंधित साप्ताहिकानेही भाजपाच्या महाराष्ट्रातील सुमार कामगिरीचे विश्लेषण करतांना अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच्या युतीवर खापर फोडले आहे. त्याबरोबरच पक्ष, कार्यकर्ते आणि राज्यातील महायुती सरकारमध्ये सुसंवाद नसल्यामुळे हा निकाल पहायला मिळाला असल्याची टीकाही विवेक साप्ताहिकाने केली आहे. लोकसभेतील अपयशाची कारणे सांगताना वा आपापली नाराजी, अस्वस्थता सांगताना जवळपास प्रत्येक कार्यकर्ता आज पहिली सुरुवात करतो ती राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या युतीपासून. राष्ट्रवादीला सोबत घेणे भाजपाच्या कार्यकर्त्याला आवडलेले नाही हे स्पष्ट आहे. याची जाणीव भाजपा नेत्यांना नाही असे नाही. अशी मांडणी 'विवेक' ने केली आहे. एक काळ असा होता, की विवेक काय किंवा ‘ऑर्गनायझर' काय, यांनी काही सल्ले दिले तर भाजपमध्ये ते गांभीर्याने घेतले जायचे. या नियतकालिकांमधून व्यक्त होणारे विचार म्हणजे संघाचे भाजपसाठी 'राजकीय सामाजिक बौद्धिक' मानले जायचे. मात्र आता भाजपच्या राजकीय, सामाजिक संवेदना पुरत्या बधिर झाल्या आहेत.
पूर्वी भाजप स्वतःची ओळख 'पार्टी विथ डिफरन्स' अशी करून द्यायचा आणि प्रत्येक 'भाजपेयीला' त्याचा अभिमान देखील असायचा. मात्र तो भाजप वाजपेयी, अडवाणी, मुरली, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांचा होता. या नेत्यांना आणि त्यांच्या समकालीन असलेल्या भाजपमधील नेतृत्वाला राजकीय नैतिकतेची चाड होती, आपण एखादा निर्णय घेतल्यानंतर त्याच्या समाजात काय प्रतिक्रिया उमटतील, आपण ज्या राजकीय तडजोडी करीत आहोत, त्या पक्षाच्या मूळ धोरणांशी सुसंगत आहेत का? याचा विचार केला जायचा. आता धोरण बाजूला राहिले आहे आणि केवळ आणि केवळ सत्ता मिळविणे, असलेली टिकविणे, काहीही करून निवडणुका जिंकणे हेच भाजपचे 'ध्येय' झालेले आहे. आताच भाजप मोदी शहांचा आहे, आणि वेळ पडल्यास संघाला देखील बाजूला ठेवायला हा भाजप जराही बिचकत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच केवळ सत्तेसाठी भाजप कोणासोबतही युती करू शकतो, कोणालाही सोबत घेऊ शकतो, इतकेच नव्हे तर थेट पक्षात प्रवेश देऊन त्या व्यक्तीचे 'राजकीय शुद्धीकरण' करतो आणि तसे करण्यात भाजपच्या आजच्या नेतृत्वाला काहीही वेगळे वाटत नाही. तसे नसते तर भाजपने महाराष्ट्रात राष्ट्रवादीला सोबत घेतलेच नसते. ज्या अजित पवारांबद्दल देवेंद्र फडणवीस 'चक्की पिसींग पिसींग अँड पिसींग' असे म्हणायचे , ते अजित पवार भाजपच्याच आशिर्वादावरच्या आणि भाजप सहभागी असलेल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होतात, याला राजकीय कोडगेपणापेक्षा वेगळे नाव काय द्यायचे, एकट्या अजित पवारांबद्दलच कशाला म्हणायचे, मोदी शहांच्या हातात भाजपची सूत्रे गेल्यानंतर या जोडीने 'काँग्रेस मुक्त भारत' अशी घोषणा दिली होती, त्याचा अर्थ त्यांना भाजपचं काँग्रेसमय करायचा आहे असे सुरुवातीला कोणाला वाटले नव्हते, मात्र आज देशात तशीच परिस्थिती आहे. भाजपला सत्तेसाठी काहीच वर्ज्य नाही आणि कोणाचीच सोबत *त्याज्य* नाही हेच या पक्षाने दिल्लीपासून गल्लीपर्यंत दाखवून दिले आहे. भाजपची निवडणुका जिंकण्याची स्वतःची वेगळी 'रणनीती' आहे आणि त्यामुळे कार्यकर्ता नाराज झाला काय आणि काहीही झाले काय, त्यांना काहीच फरक पडत नाही. म्हणूनच मग 'विवेक' मधून काही सांगितले गेले काय किंवा खुद्द सरसंघचालक काही म्हणाले काय, भाजपमध्ये त्यावर विचार करायचाच नाही असे जणू ठरले आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्याची अस्वस्थता आणि कोंडी याचा विचार पक्ष करणार नाहीच. ज्यावेळी खुद्द मोदी शहांनाच अजित पवार किंवा आणखी कोणी नकोसे होतील, तेव्हाची गोष्ट वेगळी. पण तोपर्यंत भाजपला इतर कोणी तर सोडा, खुद्द संघ परिवाराने दिलेले राजकीय सल्ले देखील केवळ 'अरण्यरुदन' ठरणार आहेत.