उभ्या महाराष्ट्राचं दैवत म्हणून विठ्ठलाकडे पाहीले जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी राज्यभरातून निघालेल्या दिंड्या आणि वारकरी पंढरपूरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. विठ्ठल खर्या अर्थानं महाराष्ट्राची वेगळी ओळख आहे. लाखो वारकरी विठूरायाच्या केवळ दर्शनासाठी पंढरीत येत असतात. समतेचा खराखुरा पुरस्कर्ता असलेला विठ्ठल हा महाराष्ट्राच्या मराठी मनाचा ध्यास आहे. कार्यप्रवण होण्याचा मंत्र देणारा पंढरीचा पांडूरंग खर्या अर्थाने सामान्यांच्या जगण्याची आस बनलेला आहे.
धर्माचे तत्वज्ञान असेल वा अध्यात्माचे, त्यातून जगण्याची प्रेरणा मिळणे अपेक्षीत असते. श्रद्धा, अंधश्रद्धा याच्या पलिकडे जावून अध्यात्मातून जीवन जगण्यासाठीची ऊर्जा शोधण्याचा प्रयत्न करता आला तर मग जीवन संपन्न व्हायला वेळ लागत नाही. उभ्या महाराष्ट्राने जीवन जगण्यासाठीची ही ऊर्जा पंढरीच्या पांडूरंगाकडून मिळविलेली आहे.
महाराष्ट्राचे ज्या काही विचारधारांनी पोषण केले त्यापैकी वारकरी संप्रदाय ही एक महत्वाची विचारधारा आहे. शेकडो वर्षापूर्वी समाजाच्या रूढी परंपरांना छेद देत सामाजिक समतेसाठी समाज मन एकत्र आणण्याचे प्रयत्न झाले ते वारकरी संप्रदायाकडूनच. रूढी, परंपरांच्या जोखडाखाली असलेल्या समाजाला पंढरीच्या पांडूरंगाच्या नावाने एकत्र करत जातीपातीच्या पलिकडे अध्यात्म नेण्याचे आणि याच अध्यात्माच्या नावाखाली कर्माचा सिद्धांत रूढ करण्यामध्ये वारकरी संप्रदायाचे योगदान निश्चित मोठे आहे.
संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, चोखामेळा, संतसेना, सावता महाराज, मुक्ताई, जनाई अशा कितीतरी संतांनी आपल्या जगण्यातून, वागण्या बोलण्यातून अभंगांमधून जे एक संपन्न तत्वज्ञान दिले ते तत्वज्ञान म्हणजेच भागवतधर्म आणि या तत्वाज्ञानाचे अधिष्ठान केले गेले ते पंढरीच्या पांडूरंगाला.
जीवन जगताना कितीही संकटे आली तरी संघर्ष करायचा असतो हे तत्वज्ञान वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राच्या मातीत रूजविले आहे. वर उल्लेख केलेले आणि ज्यांचा उल्लेख झालेला नाही अशा सर्वच संतांना त्यांच्या आयुष्यात टोकाच्या संघर्षाला सामोरे जावे लागले आहे. समाजाच्या प्रचलित परंपरांना विरोध करताना सामाजिक बहिष्कारासारख्या संकटांना अंगावर घेत वाटचाल करावी लागली मात्र हे सर्व सहन करत जीवन जगले तरच संतत्व मिळते हे त्यांच्या जीवनशैलीतून उभ्या महाराष्ट्राला कळाले.महाराष्ट्रात पुढे जी फुले, शाहू, आंबेडकरी परंपरा वाढली, सत्यशोधकी विचार वाढला, रूजला त्याचे मुळ अर्थातच वारकरी संप्रदायात आहे. म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळी ‘मूकनायक’ या नावाने नियतकालिक काढायचे होते त्यावेळी त्यांनी संत तूकारामांच्या अभंगांलाच अग्रस्थान दिले. महाराष्ट्राच्या मराठ मोळ्या मनावर वारकरी संप्रदायाचा प्रभाव किती होता हे सांगायला हे एक उदाहरण पुरेसे आहे. खर्या अर्थाने समतेचा विचार रूजवायचा असेल तर वारकरी संप्रदाय आणि संत तुकारामांसारख्या, ज्ञानोबांसारख्या संतांनी दिलेली अभंगांची शिदोरी घेवूनच वाटचाल करावी लागेल हे महाराष्ट्रातील सर्वच धुरीनांना समजले होते. म्हणूनच जोपर्यंत वारकरी संप्रदायाचा खराखुरा विचार रूजवला जात होता तोपर्यंत महाराष्ट्राची सामाजिक प्रकृती चांगली होती.
मागच्या काही काळात संतांच्या विचारांना देखील जातीच्या चौकटीत मांडण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू झाले. राजकारणातून, किंबहूना मतांच्या राजकारणांतून संतांची देखील गावागावात आणि जातीजातीत वाटनी झाली हे रोखावे असे वारकरी संप्रदायातील मान्यवरांना देखील तितकेसे प्रकर्षाने वाटत नाही आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील सामाजिक विण आता उसवू लागली असल्याचे चित्र आहे. मात्र महाराष्ट्राचा मुळ स्वभाव हा नाही, महाराष्ट्राचा मुळ धर्म हा नाही. ‘विठू माझा लेकूरवाळा’ हा खरा महाराष्ट्र धर्म आहे आणि ‘कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पुजनाचे’ ही महाराष्ट्राची ओळख आहे. हेच विठ्ठलाचे खरे स्वरूप आहे. त्या विठ्ठलाचा ध्यास करून खर्या अर्थाने महाराष्ट्र संपन्न करण्याची जबाबदारी अर्थातच आपणा सर्वांची आहे.