Advertisement

पूजा खेडकरवर मोठी कारवाई प्रशिक्षण थांबवलं

प्रजापत्र | Tuesday, 16/07/2024
बातमी शेअर करा

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरवर कारवाई करण्यात आलेली आहे. राज्य शासनाने ११ जुलै रोजी सादर केलेल्या अहवालानंतर केंद्र सरकारच्या नोडल एजन्सी डीओपीटीने तिचा प्रशिक्षण कालावधी संपुष्टात आल्याचे आदेश दिले आहेत.पूजा खेडकरचा जिल्हा प्रशिक्षणाचा कालावधी संपुष्टात आलेला आहे. अशाप्रकारची देशाच्या इतिहासात ही पहिलीच घटना असल्याचं सांगितलं जातंय.  या केंद्र सरकारच्या नोडल एजन्सीने याबाबत आदेश काढले आहेत.पूजा खेडकरला २३ जुलैपूर्वी लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी, मसुरी येथे रिपोर्ट करावं लागणार आहे. राज्य सरकारने ११ जुलै रोजी दाखल केलेल्या सविस्तर अहवालानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे.

 

 

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या कारनाम्यामुळे तिची पुण्याहून वाशिमला बदली करण्यात आली होती. आधी अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचं प्रकरण, नंतर वरिष्ठांची केबिन बळकावली, खासगी गाडीला लाल दिवा लावला.. त्यानंतर बदली झाली.त्यानंतर मात्र पूजा खेडकरने कोट्यवधींची संपत्ती असताना बोगस ओबीसी प्रमाणपत्रावर नोकरी मिळवल्याचं प्रकरण पुढे आलं आणि सगळ्यांनाच धक्का बसला. एवढंच नाहीतर दिव्यांगाचं बनावट प्रमाणपही पूजाने मिळवल्याचं प्रकरण पुढे आलं. या सगळ्या प्रकरणाची यथोचित चौकशी करावी, अशी विरोधी पक्षाने मागणी केली.

 

 

आता पूजा खेडकरचा प्रशिक्षण कालावधी संपुष्टात आणत तिच्यावर डीओपीटीने कारवाई केली आहे. तिच्याशी संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समितीदेखील गठीत करण्यात आलेली असून तिच्या अडचणींमध्ये आता वाढ होताना दिसून येत आहे.प्रशिक्षण कालावधी संपुष्टात आणल्याच्या कारवाईनंतर पूजा खेडकरने वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातून तातडीने शासकीय विश्रामगृह गाठलं आहे. या प्रकरणात पूजा खेडकरवर आणि तिच्या कुटुंबियांच्या इतर प्रकरणांमध्ये काय कारवाई होते, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

Advertisement

Advertisement