मुंबई- आरक्षणावरुन मराठा आणि ओबीसींमध्ये निर्माण झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांनी सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तब्बल दीड तास दोघांमध्ये आरक्षणाच्या विषयावर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान दोन दिवसांत आपण मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करु, असं शरद पवारांनी सांगितल्याचं भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
भुजबळ म्हणाले, प्रतिक्षेनंतर मला शरद पवारांनी भेटण्यासाठी बोलावलं. त्यांनी मला विचारलं कशासाठी आले आहेत. त्यावर मी त्यांना सांगितलं की ओबीसी मराठावरून वाद सुरू आहे. तुम्ही राज्यातील सर्वात जेष्ठ नेते आहात, तुम्ही मुख्यमंत्री असताना आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, आता वाद मिटवला पाहिजे यासाठी भेट घेतली. आमच्यामध्ये दीड तास चर्चा झाली.
PM मोदी, राहुल गांधींनाही भेटणार
जरांगे सोबत काय चर्चा केली आम्हाला माहिती नाही. हाके, ससाणे, वाघमारे यांचं उपोषण सोडायला गेले त्यावेळी काय चर्चा झाली मला माहीत नाही. मी त्यांना विनंती केली की, तुम्हाला राज्याचा चांगला अभ्यास आहे. आम्हाला सगळा अभ्यास आहे असं नाही. मी या विषयाबाबत कोणालाही भेटायला तयार आहे, गोर-गरिबांची घरे पेटता काम नये. यावर मी कोणालाही भेटायला तयार आहे. मग पंतप्रधान असो की राहुल गांधी असोत. आमच्यामध्ये धनगर आरक्षणावर विषयी चर्चा झाली. सर्व समाजाच्या आरक्षणावर पवारांशी चर्चा झाली.