विधानसभा निवडणुकीच्या अगोदर होत असलेल्या विधानपरिषद निवडणुकीत स्वतःकडे पुरेसे संख्याबळ नसतानाही तिसरा उमेदवार देण्याचे महाविकास आघाडीचे साहस अखेर दुःसाहस ठरले. खरेतर महाविकास आघाडीने दोनच उमेदवार दिले असते तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती, मात्र शरद पवारांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांना काँग्रेसची अधिकची मते आघाडीकडे वळतील असा जो विश्वास होता, त्याला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या निवडणुकीला काँग्रेसची मते फुटण्याची परंपरा याहीवेळी कायम राहिली आणि त्यामुळेच महाविकास आघाडीचा मुखभंग झाला. बाकी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची रणनीती यशस्वी झाली हे वास्तव आहे.
राज्य विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत महायुतीला आपले वर्चस्व राखता आले. महायुतीच्या अपेक्षेप्रणमाणे ९ जागा निवडणून आल्या. खरेतर विधान परिषदेच्या निवडणुकीत आपले किती उमेदवार निवडून येऊ शकतात याची जाणीव प्रत्येक राजकीय पक्षाला असते, त्यामुळे ज्यावेळी कोणीतरी क्षमतेपेक्षा अधिकचे उमेदवार उभे करतो, त्यावेळी मतांची फाटाफूट आणि घोडेबाजार अपेक्षित असतोच, आतापर्यंत भाजपकडून असा जास्तीचा उमेदवार उभा केला जायचा, यावेळी मात्र हे साहस महाविकास आघाडीने केले. यात महाविकास आघाडीला काही मते कमी आहेत हे माहित होते, मात्र अजित पवार गटाची काही मते फुटतील यावरच महाविकास आघाडीचे सारे काही अवलंबून होते. लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आहे आणि त्याचे पडसाद दिसतील या गृहितकावर महाविकास आघाडीचे सारे गणित अवलंबून होते. महाविकास आघाडीने हे गृहीतक मांडताना काँग्रेसवर अतिरेकी विश्वास दाखविला, त्याचा परिणाम कदाचित पाहायला मिळाला असावा. आतापर्यंत अनेक विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटण्याची परंपरा राहिलेली आहे. यावेळी तर काँग्रेसकडे ३७ मते असतांना, पक्षाने एकच उमेदवार दिला होता, म्हणजे काँग्रेसकडे तब्बल १४ मते अतिरिक्त होती, त्यातील दोन मतांचा कोटा पक्षाने प्रज्ञा सातव यांच्यासाठी वाढविला होता हे गृहीत धरले तरी काँग्रेसकडे किमान १२ मते अतिरिक्त होती, ती जर शरद पवारांचे उमेदवार असलेल्या जयंत पाटलांकडे गेली असती, तर निकाल कदाचित वेगळा असता. मात्र काँग्रेसची किमान ५ मते अजित पवार गटाकडे वळल्याचे आता स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला कोणी वाली नाही, प्रदेशाध्यक्षाचे पक्षावर नियंत्रण नाही आणि त्यातूनच मग कोणी फुटले काय, किंवा काही झाले काय, या पक्षातील नेत्यांना काही फरक पडत नाही हीच मानसिकता काँग्रेसच्या आमदारांची आहे, आणि त्यामुळेच काँग्रेसचे आमदार सहज फुटतात, आताही तोच अनुभव आला.
राहिला प्रश्न अजित पवार आणि शरद पवारांचा, यात लोकसभा निवडणुकीत भलेही अजित पवारांना धक्का बसला असेल, मात्र विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी रणनीतीमध्ये अजित पवार हे शरद पवारांपेक्षा सरस ठरले. अगदी सुरुवातीपासून स्वतः शरद पवार, अजित पवार गटाचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत असे सांगत होते. त्यामुळेच अजित पवार गटाने आपापली यंत्रणा काहीशी अधिक सुरक्षित केली होती. अजित पवार गटाकडे स्वतःचे ४२ आमदार होते, आणि त्यांना ४ मते अधिकची लागणार होती, प्रत्यक्षात अजित पवार गटाच्या उमेदवारांना ४७ मते मिळाली, म्हणजे त्यांनी स्वतःचा गट बंदोबस्तात ठेवून महाविकास आघाडीच्या मतदानाला सुरुंग लावून ५ मते अधिकची मिळविली. राष्ट्रवादीचे शरद पवार, जयंत पाटील आदी अनेक नेते वेगवेगळे दावे करीत असतांनाही अजित पवारांनी शांतपणे केलेले नियोजन अखेर यशस्वी ठरले. विशेषतः महायुतीने शरद पवारांची रणनीती फेल ठरविण्याच्या दिशेने जी पाऊले उचलली, त्यालाही यश आले.
महाराष्ट्रात महायुतीला आव्हान देण्याची क्षमता शरद पवार यांच्यामध्येच आहे, त्यामुळे शरद पवारांचा उमेदवार पडला तर साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मानसिक खच्चीकरण करता येईल हे भाजप पुरते जाणून होता आणि त्यासाठीच पुन्हा अजित पवारांनाच पुढे केले गेले. भाजपचे स्वतःचे पाच उमेदवारांचे नियोजन व्यवस्थित होते, ४ उमेदवार पहिल्या पसंतीत आणि १ उमेदवार दुसऱ्या पसंतीत असे भाजपचे तगडे नियोजन होते आणि त्यापुढे शरद पवारांची रणनीती अपयशी ठरली.
खरेतर आपल्याकडे पुरेसे मतदान नसताना महाविकास आघाडीने ही निवडणूक टाळायला पाहिजे होती. तसे झाले असते तर लोकसभेच्या पराभवाने दुर्मुखलेल्या महायुतीला वेगळा विजयोत्सव साजरा करण्याची संधी मिळाली नसती आणि त्यांना अधिकचे बळ देखील मिळाले नसते, मात्र आघाडीने हे टाळले नाही. हे दुःसाहसच आता आघाडीला नडले आहे.