बीड दि.११ (प्रतिनिधी)- मराठा आरक्षण जनजागृतीसह शांतता रॅली आज बीड शहरातून काढली जाणार आहे. या रॅलीत मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील सहभागी होणार आहेत. रॅलीनंतर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातून समाजाशी संवाद साधणार आहेत. ते काय बोलणार आणि त्यांच्या निशाण्यावर कोण असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे; तर दुसऱ्या बाजूला संभाव्य गर्दी पाहता पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे.
तसेच पाच हजार स्वयंसेवकही मदतीला आहेत. दरम्यान, आज सकाळपासूनच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजबांधव, महिला, तरूणी या बीडमध्ये दाखल झाल्या आहेत. गर्दीने बीड शहरातील सर्वच प्रमुख रस्ते ब्लॉक झाले आहेत. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मराठा समाज बांधव रॅलीत सहभागी होत आहेत. बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात होऊन माळीवेस, सुभाष रोड, अण्णा भाऊ साठे चौक, जालना रोडमार्गे ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणार आहे. या रॅलीची संयोजकांकडून पूर्ण तयारी झाली आहे.