मुंबई- मनसेमधून वंचित आघाडीमध्ये गेलेले पुण्याचे नेते वसंत मोरे यांनी मंगळवारी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून ते पुन्हा एकदा स्वगृही परतले आहेत. यावेळी संजय राऊत यांचीही उपस्थिती होती.
वसंत मोरे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह 'मातोश्री'वर जात ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. यावेळी काही नगरसेवक, शाखाध्यक्ष, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. आपण स्वगृही परतत असल्याच्या भावना वसंत मोरेंनी व्यक्त केल्या. त्यांनी १२ मार्च रोजी मनसेला रामराम ठोकला होता.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेच्या बाहेर पक्षात काय वागणूक मिळते, काय सन्मान मिळतो.. याचा अनुभव घेऊन तुम्ही परिपक्व होऊन आलात. त्यामुळे मी तुम्हाला एक शिक्षा सुनावतो. असं म्हणत उपस्थितांना उद्देशून शिक्षा द्यायची का? असं विचारलं.
त्यावर सर्वांनी 'हो' म्हणतात, उद्धव ठाकरे म्हणाले की, तुमच्या सगळ्यांनी ही शिक्षा देतो की तुम्ही पूर्वीपेक्षा कित्येक पटींनी शिवसेना वाढीसाठी काम केलं पाहिजे. लोकसभा निवडणुकीतून महाराष्ट्राने देशाला दिशा दिली आहे. तसंच काम करुन दाखवा, मी पुण्यात मोठा मेळावा घेतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मंगळवार, दि. ९ जुलै रोजी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. यापूर्वी त्यांनी शिवसेनेसोबत काम केलेलं आहे. परंतु राज ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित होऊत ते राज यांच्यासोबत गेले होते. आता पुन्हा ते स्वगृही परतले आहेत.