मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा जनजागरण शांतता रॅलीचे परभणीत आगमन झाले आहे. शांतता रॅलीत सहभागी होण्यासाठी परभणी जिल्ह्यातील लाखो मराठा बांधव शहरात दाखल झाले आहेत. जरांगे पाटील यांच्या परभणी दौऱ्यानिमित्त विविध पक्षांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील बॅनर शहरात लावण्यात आले. यातच शहरातील जिंतूर रोडवरील नूतन महाविद्यालयाच्या समोर लावण्यात आलेला मुख्यमंत्र्यांचा बॅनर मराठा समाजातील युवकांनी फाडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयीचा आक्रोश मराठा समाजाने व्यक्त केला आहे.
आज परभणी शहरामध्ये मराठा समाज रस्त्यावर उतरलेला दिसून येत आहे. सरकारने १३ तारखेपर्यंत सगेसोयरेचा अध्यादेश काढावा यासोबतच मराठ्यांच्या महत्वाच्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी मराठा समाजाने मनोज जरांगेंच्या नेतृत्वात शांतता रॅलीचे आयोजन केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या आक्रोशाचा मोठा फटका सरकारला बसला आहे. येणाऱ्या काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत, या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आता लावून धरली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फाडले बॅनर
मनोज जरांगे पाटील परभणी जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने विविध पक्षांच्या वतीने त्यांच्या स्वागताचे बॅनर सर्वत्र लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील असेच बॅनर शहरात लावले आहेत. शहरातील महाराणा प्रताप चौकात लावलेल्या बॅनरवरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो फाडण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या सरकारचा निषेधच असा पवित्रा समाजातील युवकांनी घेतला आहे.