मुंबई - पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आलं. मंत्री शंभूराज देसाई यांनी हे विधेयक मांडलं. या विधेयकातील तरतुदींनुसार, पेपर फोडणाऱ्यांना मोठी शिक्षा अन् मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. यामुळं पेपर फुटीच्या घटनांना चाप लावण्यास मदत होईल असं सरकारकडून सांगितलं जात आहे.
परीक्षेतील तोतयागिरी, फेसवेगिरीला या कायद्यामुळं आळा बसणार आहे. कारण यामध्ये अपराध करणाऱ्या व्यक्तीला ३ ते १० वर्षांची शिक्षा तसेच १ कोटी रुपये दंडाची तरतूद असणार आहे, असं देसाई यांनी सांगितलं आहे.दरम्यान, महिन्याभरापूर्वी वैद्यकीय शिक्षणासाठीच्या नीट परीक्षेच पेपर फुटल्यानं देशभरात खळबळ उडाली होती. महाराष्ट्रातही यापूर्वी अनेक पेपरफुटीच्या घटना समोर आल्या आहेत. यापार्श्वभूमीवर केंद्रसरकारनं फेब्रुवारीमध्ये एक कायदा मंजूर केला होता. या कायद्यानुसार पेपरलीकसाठी तीन ते पाच वर्षांची शिक्षा अन् दहा लाखाचा दंड अशी शिक्षा होती. तसंच जर पेपरलीकचा सामुहिक गुन्हा केल्यास एक कोटी रूपयांचा दंड अशी कडक तरतूद करण्यात आली होती.
याच केंद्राच्या कायद्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातही आता कायदा होणार आहे. याचं विधेयक आज विधानसभेत मांडण्यात आलं. या कायद्यातही केंद्राप्रमाणं तीन ते १० वर्षांची शिक्षा अन् १ कोटींचा दंडाची तरतूद करण्यात आली आहे.