मुंबई - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसाद आणि त्यासाठी होत असलेली आर्थिक लूट लक्षात घेता आता या योजनेच्या लाभार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी नवं अॅप डेव्हलप करण्यात आलं आहे. त्यामुळं ज्या महिलांना अर्ज करताना अडचणी येत आहेत त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
नारीशक्ती दूत असं या अॅपचं नाव आहे. ही योजना लागू झाल्यानंतर लगेचच हे अॅप सुरु होणार होतं परंतू तांत्रिक कारणांमुळं ते बंद ठेवण्यात आलं होतं. पण आता यातील तांत्रिक तृटी दूर करण्यात आल्या आहेत. या अॅपच्या माध्यमातून आता लाडकी बहीण योजनेसाठी घर बसल्या अर्ज करता येणार आहे. यामध्ये आता उत्पन्न आणि रहिवासी दाखल्याचा कॉलम देखील सुरु करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत हे अॅप अपडेट होणार आहे.
अॅप कसं वापरायचं?
गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप उपलब्ध आहे. त्यात सुरुवातीला मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन करायचं आहे. त्यानंतर त्यातील प्रोफाईलमध्ये आपली माहिती भरुन नोंदणी करायची आहे. यामध्ये तुम्ही कुठल्या गटात बसता याचा पर्याय निवडायचा आहे. यामध्ये बचत गटाचे सदस्य, गृहिणी आणि इतर असे पर्याय आहेत. या सर्व गोष्टी यशस्वीरित्या जर भरल्यानंतर महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.