Advertisement

संपादकीय अग्रलेख- भय म्हणतात ते यालाच

प्रजापत्र | Wednesday, 03/07/2024
बातमी शेअर करा

      ज्या राहूल गांधींना कांहीं वर्षांपूर्वी भाजपवाले फारसे खिजगिणतीत देखील घेत नव्हते, त्या राहूल गांधींच्या भाषणामुळे सर्वशक्तिमान म्हणवला जाणारा भाजप मुळापासून कसा हादरला आहे, हेच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील पंतप्रधानांच्या उत्तरावरून स्पष्ट झाले आहे. मुळात पंतप्रधानांनी अभिभाषणाला उत्तर देण्याच्या ठरलेल्या वेळेअगोदर पंतप्रधानांना बोलावे लागले आणि पुन्हा राहुल गांधी जे भाजपेयींनबद्दल बोलले होते, ते समस्त हिंदूंबद्दल बोलले हे पुन्हा *प्यंह* ठसविण्याचा खटाटोप खुद्द पंतप्रधानांना करावा लागला, विरोधी पक्षाची भीती म्हणतात ती यालाच.
 

 

 

    २०१२ नंतर, ज्यावेळी नरेंद्र मोदींना भाजपने पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून समोर केले होते, तेंव्हापासून नरेंद्र मोदी ओळखले जातात ते फायरब्रँड नेते म्हणूनच. ते देशात प्रसिद्ध झाले ते त्यांच्या भाषणासाठी. आजच्या घडीला तरी त्यांच्या तोडीस तोड वक्ता ना भाजपमध्ये दुसरा आहे ना विरोधीपक्षांकडे. मोदींमध्ये आपल्या भाषणातून समोरच्यांना खिळवून ठेवण्याची क्षमता आहे, आपले खोटे असले तरी ते ठामपणे समोरच्याच्या गळी उतरविणे देखील मोदींना चांगले जमते. १० वर्षांपूर्वी त्यांच्यासमोर राहूल गांधींचे भाषण म्हणजे तसे तुलना करता येणार नाही असेच होते. आणि सातत्याने राहुल गांधी आपल्या स्पर्धेत नाहीत, त्यांची भाजप नेत्यांशी तुलना होऊ शकत नाही असेच नेरेटिव्ह स्थापित करण्याचा भाजपचा प्रयत्न राहिला. भाजपने आणि त्यांच्या ट्रोल बहाद्दरांनी आणि भक्तांनी राहूल गांधींना 'पप्पू' ठरविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र राहुल गांधींनी त्यातूनही स्वतःला सिद्ध केले आहे.

 

 

     राहुल गांधींनी विरोधीपक्ष नेता म्हणून दोन दिवसांपूर्वी लोकसभेत केलेले भाषण हे भाजपसारखी स्वतःला 'महाशक्ती' म्हणविणारी व्यवस्था संपूर्णपणे हादरून गेल्याचे चित्र आहे. ज्या राहूल गांधींना मोदी आतापर्यंत फारसे गांभीर्याने घेत नव्हते, आणि मोदी गांभीर्याने घेत नाहीत, म्हणून भाजपचे इतर लोकही राहूल गांधींची टर उडवायचे, त्याच राहूल गांधींनी देशाच्या पंतप्रधानांना पूर्वनियोजित वेळेच्या अगोदरच राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर द्यायला भाग पाडले यातच विरोधीपक्ष काय करू शकतो याचे उत्तर मिळाले आहे.

 

 

    राहूल गांधी यांच्या दोन दिवसांपूर्वीच्या भाषणात आक्रमकता होती, ठामपणा होता आणि त्याही पुढे जाऊन हजरजबाबीपणा होता. भाजपला राहूल गांधींकडून कदाचित याची अपेक्षा नसेलही. मात्र त्याहीपेक्षा भाजपला हादरवणारी कोणती गोष्ट राहूल गांधींनी केली असेल तर आतापर्यंत हिंदू शब्दापासून स्वतःला दूर ठेवण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेलाच राहूल गांधींनी छेद दिला. सभागृहात 'मी देखील हिंदू आहे' असे ठणकावून सांगणारे राहूल गांधी म्हणूनच आता भाजपसाठी अडचणीचे ठरणार आहेत. आणि त्यामुळेच पंतप्रधानांनी काल पुन्हा लोकसभेत बोलताना 'राहूल गांधींनी संपूर्ण हिंदू समाजाचा अपमान केला आहे, हिंदूंच्या येणाऱ्या पिढ्या त्यांना माफ करणार नाहीत' असे काहीसे भाषण केले. मुळात आतापर्यंत हिंदू म्हणजे भाजप अशी मक्तेदारी स्थापित करण्याचीच भूमिका आणि धोरण भाजपचे राहिले आहे. आता राहूल गांधी त्यालाच छेद द्यायला निघाल्यास भाजपला विचार करावा लागणारच. राहुल गांधी विरोधीपक्ष नेता म्हणून भगवान शंकरांचा, गुरु गोविंदसिंहांचा फोटो दाखविणार असतील तर हा भाजपच्या आतापर्यंतच्या मक्तेदारीला मोठा धक्काच होता, आणि म्हणूनच पंतप्रधांना स्वतःला एक दिवस अगोदरच यावर बोलावे लागले. असेही समोरचा व्यक्ती जे बोलला नाही, ते त्याच्या माथी मारण्यात भाजपचा, मोदींचा हातखंडा आहे, आता तो प्रयोग ते राहुल गांधींवर करू पाहात आहेत. मोदींचे कालचे संपूर्ण भाषण त्याचा प्रयोगाचा एक भाग होते. त्यात त्यांना किती यश येते हा भाग वेगळा, कारण सध्या समाजमाध्यमे सक्रिय आहेत, थेट प्रसारण होत असल्याने राहूल गांधी खरोखर काय बोलले, त्यांनी नेमकी कोणावर टीका केली होती हे लपून राहिलेले नाही. भाजप कसे भयाचे राजकारण करीत आहे हे राहुल गांधींनी स्पष्ट केले होतेच, आता मात्र सत्ताधाऱ्यांना विरोधीपक्षाचे भय वाटू लागले आहे. विरोधीपक्ष देखील सत्ताधाऱ्यांना भीती दाखवू शकतात हेच राहूल गांधींनी दाखवून दिले आहे.

Advertisement

Advertisement