Advertisement

धक्कादायक! पोलीस ठाण्यातच युवकाने घेतले विषारी औषध

प्रजापत्र | Tuesday, 02/07/2024
बातमी शेअर करा

धाराशिव - तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये धक्कादायक घटना घडली आहे जीवाला धोका असल्याची तक्रार द्यायला गेलेल्या युवकालाच पोलिसांनी मारहाण केल्याने या युवकाने पोलीस ठाण्याच्या पायरीवर विषारी औषध घेऊन आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. युवकाची प्रकृती गंभीर असून त्याला धाराशिवच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.ही घटना काल दुपारी घडली आहे.

 

 भैरुनाथ औदंबर माने या युवकाला गावातील एका व्यक्तिने जीवे मारण्याची धमकी दिली होती म्हणून तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला आला होता तक्रार न घेताच वैभव देशमुख नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने भैरुनाथ माने याला कॉलरला धरून पोलीस निरीक्षक यांच्या कॅबिनकडे ओढत घेऊन जात असताना भैरुनाथ यांनी देशमुख यांना माफ़ी मागितली तरी त्यांनी ऐकले नाही यानंतर पोलीस स्टेशनच्या पाठीमागे शौचालयात जात असताना महेश तावरे व पोलीस गार्ड यांनी मला घेरून लाथा बुक्क्यांनी कंबरेच्या बेल्टनी मारहाण केली या मारहाणीत माझे कपडे फाडून मला नग्न केले तसेच पोटात व कंबरे खाली मारहाण केली असल्याचे माने यांनी पोलीस निरीक्षक यांना 1 जुलैला दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे.

 

दरम्यान माने याला धाराशिवच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे यावेळी भैरुनाथ माने यांचे वडिलांनी माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहीजे  अशी मागणी करत आहेत तर तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता भैरुनाथ माने याच्या विरोधात गावातून अनेक तक्रारी होत्या, तसेच तो त्यादिवशी दारू पिऊन पोलीस स्टेशनला आला होता,परंतु तो माफ़ी मागून दुसऱ्यादिवशी तक्रार देण्यासाठी येतो असे सांगून माझ्या कॅबिनमधून गेला आणि बाहेर मारहाणीचा प्रकार घडला असल्याचं समजले त्यामुळे यासर्व प्रकारणाची चौकशी करून आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक खांडेकर यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement