Advertisement

सभागृहात शिवीगाळ करणे भोवले

प्रजापत्र | Tuesday, 02/07/2024
बातमी शेअर करा

राहुल गांधी यांनी हिंदूंवरून केलेल्या वक्तव्यावरील निषेध प्रस्तावावर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केली होती. प्रसाद लाड यांना हासडलेली शिवी दानवे यांना महागात पडली असून त्यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. 

 

 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंदूंबाबत लोकसभेत केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधान परिषदेत उमटले. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आणलेल्या राहुल गांधी यांच्या निषेधाच्या प्रस्तावाला आक्षेप घेताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची जीभ घसरली आणि सभागृहाच्या परंपरेचा चिंधड्या उडाल्या. आपल्या जागेवरून बाहेर येत दानवे यांनी लाड यांना थेट शिवीच हासडल्याने झालेल्या हमरीतुमरीत सभागृहातली चर्चा की गल्लीबोळातले भांडण याचे भानही सदस्यांना राहिले नाही. 

 

 

राहुल गांधी यांच्या निषेधाचा ठराव  करण्याची परवानगी लाड यांनी मागितली. मात्र,  उपसभापतींनी त्यांना नंतर चर्चा करू, सांगत खाली बसवले. यावेळी लाड यांनी घोषणा दिल्या. त्यामुळे गोंधळ होऊन कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब झाले. कामकाज सुरू झाल्यानंतर लाड यांनी निषेधाचा प्रस्ताव मंजूर करून तो लोकसभेला पाठवा, अशी मागणी केली. त्यावेळी विरोधी पक्षनेते बोलायला उभे राहिले असता लाड यांनी हातवारे केले. त्याला आक्षेप घेताना दानवे यांचा तोल ढासळला. आपल्या जागेवरून बाहेर येत त्यांनी लाड यांना शिवीगाळ केली. लाड यांच्याकडूनही शिवीगाळ झाली. अखेर उपसभापतींनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. यावरून दानवे यांनी आपल्याला पश्चाताप होत नसल्याचे म्हटले होते.

Advertisement

Advertisement