Advertisement

संपादकीय अग्रलेख- आक्रमक विरोधक

प्रजापत्र | Tuesday, 02/07/2024
बातमी शेअर करा

         १८ व्या लोकसभेत मोदींना वाटते तितके विरोधक कमकुवत राहिलेले नाहीत. राहुल गांधींना तर विरोधी पक्षनेतेपदाचे कवचकुंडल मिळालेलं आहे. त्यामुळे आता सभागृहात विरोधकांचा आवाजच निर्माण होऊ द्यायचा नाही हे धोरण सरकारला रेटता येणार नाही. राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील चर्चेत राहुल गांधींनी आणि एकंदरच विरोधी पक्षाने त्याची चुणूक सरकारला दाखविली आहे.
     लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरु असतांना विरोधी पक्षनेते राहुल गांधींची आक्रमकता सार्‍या सभागृहाला अनुभवायला मिळाली. मुळातच राहुल गांधींना सत्ताधारी पक्षाकडून सातत्याने जे 'पप्पू’ ठरविण्याचे उपदव्याप मागच्या दहा वर्षात सुरु होते ते आता सत्ताधार्‍यांच्या अंगलट येतील असेच सारे चित्र आहे. राहुल गांधी यांनी मागच्या दहा वर्षात स्वत:ला वेगवेगळ्या अनुभवांमधून सिध्द केले आहे. बोलतांना आपल्या वक्तव्यातला ठामपणा आणि गरज असेल तेथे आक्रमकता या दोन्ही गोष्टी घेऊन आता राहुल गांधी लोकसभेच्या सभागृहात आहेत. मागच्यावेळी मोदी सरकारने विरोधी पक्षनेतेपद सुध्दा काँग्रेसला मिळू दिले नव्हते. आता मात्र सभागृहात विरोधकांची संख्या मोठी आहे. काँग्रेसकडे अधिकृतपणे विरोधी पक्षनेतेपद आहे आणि 'इंडिया' आघाडीचा विचार केल्यास दोनशेहून अधिक खासदार लोकसभेत विरोधी पक्षाचे आहेत. त्यामुळेच आता आपलाच अजेंडा रेटून नेणे सरकारला सहज सोपे असणार नाही.

 

     राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी आज देशाला हिंदुंची खरी ओळख सांगितली. त्यासोबतच केवळ भाजप म्हणजे हिंदू नाही हे देखील ठणकावून सांगितले. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपवर केलेली टीका म्हणजे समस्त हिंदू समाजावर केलेली टीका आहे हे भासविण्याचा प्रयत्न भलेही केला असेल पण राहुल गांधींनी तितक्याच आक्रमकतेने तो परतवून लावला हे देखील तितकेच खरे. ज्या हिंदू धर्मात सहिष्णुता शिकविली जाते, ज्या धर्मातील देवता देखील सहिष्णुता शिकवितात, त्या धर्मात केवळ हिंसा आणि हिंसा म्हणणारे लोक हिंदू असूच शकत नाहीत या शब्दात राहुल गांधींनी जी सणसणीत चपराक भाजपाला लगावली. त्यामुळे भाजप नेत्यांना झिणझिण्या येणे स्वाभाविक होते. आतापर्यंत आम्ही सांगू तोच धर्म, आणि तेच धर्माचे तत्वज्ञान अशी भूमिका भाजपा घेत आला आहे. हिंदुत्वाची तर मक्तेदारीच जणू काही भाजपाकडे आहे. त्यामुळे भाजपाचे लोक सांगतील ते हिंदुत्व असे एक प्रकारचे गृहितक  देशभरात पसरविण्याचा प्रयत्न भाजपाने सातत्याने केला होता. आतापर्यंतच्या काळात काँग्रेस धार्मिक विषयापासून स्वत:ला काहीसा बाजूला ठेवत आली होती. परिणामी काँग्रेस म्हणजे हिंदू विरोधी असे एक नेरेटिव्ह स्थापित करण्यात भाजपाला बर्‍यापैकी यश आले होते. आता राहुल गांधी यांची भूमिका भाजपाच्या या नेरेटिव्हला धक्का देणारी ठरत आहे. हिंदुंची व्याख्या काँग्रेसकडे देखील आहे आणि भाजपापेक्षा ते सर्वसमावेशक आहे हे बोलण्याचे धारिष्ठ्य राहुल गांधी करीत आहेत आणि म्हणूनच भाजपासाठी हे अधिक अडचणीचे आहे. खर्‍या अर्थाने हिंदू धर्म सांगायला कोणी सुरुवात केली तर त्याचा मोठा फटका भाजपालाच बसेल. कारण भाजपाने आपल्या राजकीय सोयीसाठी हिंदू धर्मातील तत्वज्ञांची जी मोडतोड केली आहे ती आता उघडी पडायला सुरुवात होत आहे. राहुल गांधी यांनी ते सुरु केले आहे.

 

     केवळ हिंदु धर्माबद्दलच नाही तर अग्निवीरच्या मुद्यावरून सैनिकांमध्ये केला जाणारा भेदभाव देखील राहूल गांधींनी सभागृहासमोर आक्रमकपणे मांडला. एकूणच राष्ट्रपतीच्या अभिभाषणाला उत्तर देतांना राहूल गांधी यांनी सरकारी धोरणाची जी चिरफाड केली आणि एकूणच धोरणातला पोकळपणा ज्या पद्धतीने समोर मांडला ती आगामी पाच वर्षे सरकारला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल याची नांदी ठरणार आहे. विरोधी पक्षाला सहज गुंडाळता येते या भ्रमात आता मोदी-शहांना आणि 'एनडीए' सरकारला राहता येणार नाही. आता कोठे विरोधकांच्या आक्रमकतेची सुरुवात झाली आहे. अचानक विरोधी पक्षाचे माईक बंद करून सभागृहात त्यांचा आवाज दाबण्याचा रडीचा डाव व्यवस्था हातात असल्यावर करता येईलही कदाचित. पण विरोधकांची आक्रमकता उद्या रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारकडे काय उत्तर असणार आहे?
 

Advertisement

Advertisement