वाशिम दि. 12 इन्शुरन्स कंपनीचे कमिशन मिळण्याचे आमिष दाखवून एका डॉक्टराची तब्बल 41 लाख 80 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्या प्रकरणी वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपिर पोलिसांनी ठाणे येथून एका महिलेसह एकाला अटक केली आहे. यातील मुख्यसूत्रधार हा अद्यापही मोकाटच असून तो शहरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याचे बोलल्या जात आहे.
मंगरुळपिर येथील डॉ.विनोद अनंतराव सुरडकर यांनी 26 नोव्हेंबर 2020 रोजी मंगरुळपिर पोलिसांत तक्रार दिली होती. इन्शुरन्स कंपनीचे कमिशन देण्याचे आमिष दाखवून आरोपी दिव्यप्रकाश इंद्रकुमार शुक्ला उर्फ सुरेंद्र पटेल आणि स्वाती नाईक उर्फ स्वाती निखिल शिंदे यांनी फिर्यादीच्या वेगवेगळ्या इन्शुरन्स पॉलिसी काढल्या होत्या.
यासाठी फिर्यादीकडून सन 2015-16 पासून ऑनलाईन पद्धतीने पैसे घेतले होते. एकूण 41 लाख 80 हजार रुपये दोघा भामट्यांनी डॉ. सुरडकर यांच्याकडून उकळले होते. पण, कमिशनचे पैसेच न दिल्यामुळे डॉ.विनोद सुरडकर यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंत केडगे यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार धनंजय जगदाळे यांच्याकडे होता. तपासात पोलिसांनी सदर आरोपींना ठाणे येथून 11 जानेवारी रोजी अटक केली असून आज सदर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले.
त्यांना 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. या प्रकरणाची कसून चौकशी केल्यानंतर मोठं रॅकेट आहे का याचा तपास लागणार असल्याचे तपासधिकारी ठाणेदार जगदाळे यांनी सांगितले.