Advertisement

आरोपीला पावसापासून वाचविण्यासाठी कंबरेपासून वाकले पोलीस

प्रजापत्र | Sunday, 30/06/2024
बातमी शेअर करा

बीड दि. २९ (प्रतिनिधी)-सर्वसाधारण प्रकरणात आरोपीला हाडतूड करणारे,प्रसंगी अर्वाच्च भाषा वापरणारे पोलीस सर्वांनाच ज्ञात आहेत. मात्र एखादा आरोपी 'हायप्रोफाईल' असेल तर त्याला पाऊस लागू नये यासाठी पोलीस कसे कंबरेपासून वागतात याचे प्रदर्शन शनिवारी बीडमध्ये पाहायला मिळाले.एखाद्या आरोपीला इतके सौजन्य दाखविण्याचे 'ज्ञान' पोलिसांना होण्यामागचे कारण काय याचीच चर्चा न्यायालय परिसरात होत होती.
बीड जिल्हा पोलीस दलाबद्दल फारसे चांगले बोलण्याची परिस्थिती राहिलेली नाही.कोणत्या आरोपीला कधी अटक करायचे याचे 'टायमिंग' सुद्धा चर्चेचा विषय ठरलेले आहे.त्यातच आर्थिक गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांकडून मिळणारी 'शाही' वागणूक आता संतापाचा विषय ठरत आहे.मोजक्याच लोकांसाठी असली शाही बडदास्त ठेवण्याच्या सूचना पोलिसांना नेमक्या कोणत्या अधिकाऱ्यांकडून आहेत आणि पोलीस अधीक्षक हे सारे का होऊ देत आहेत हे कळायला मार्ग नाही.

 


 

शनिवारी तर पोलीस काही खास आरोपींची बडदास्त कशी ठेवतात याचे ओंगळवाणे प्रदर्शन बीडच्या न्यायालय परिसरात पाहायला मिळाले.एका आर्थिक गुन्ह्याच्या प्रकरणातील एका आरोपीला शनिवारी बीडच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.त्या आरोपीबद्दल असलेला सामान्यांचा संताप लक्षात घेता त्याच्या भोवती पोलिसांची सुरक्षा असण्यात काही गैर नाही, मात्र सदर आरोपीला न्यायालयातून परत नेत असताना अचानक पाऊस सुरु झाला आणि मग आरोपीच्या अंगावर पावसाचा एक थेंबही पडू नये यासाठी पोलिसांनी जी धावाधाव केली,एक ऑटो थांबवून ठेवला, त्या आरोपीला बसविल्यानंतरही बाजूने पाऊस लागेल म्हणून पोलीस चक्क कंबरेपर्यंत वाकून रिक्षाच्या खुल्या बाजूला छत्री धरताना पाहायला मिळाले.एखाद्या आरोपीला देण्यात येणारी अशी वागणूक न्यायालयात उपस्थित असलेल्या ठेवीदारांच्या मनाला मात्र डागण्या देणारी ठरली.

 

पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह
एखादा सामान्य आरोपी असेल तर पोलीस त्याच्याशी कसे वागतात,त्याला केवळ वडापाव खाऊन पोलीस कोठडीत रात्र कशी काढावी लागते यात काही नवीन नाही. मात्र हायप्रोफाईल आरोपीच्या बाबतीत पोलिसांकडून शाही बडदास्त ठेवण्याचे अनेक प्रकार मागच्या काही दिवसात समोर आले आहेत. अगदी एखाद्यावर गुन्हा दाखल होणे लांबविण्यासाठी पोलीस अधिकारीच मांडवलीच्या बैठका घेताना जिल्ह्याने पाहिले आहे. ठेवीदारांची समजूत पोलीस अधीक्षक काढतात हे देखील जिल्ह्याने पहिले आहे. ही सारी 'कृतज्ञता' नेमकी कशासाठी आणि 'नंदा'च्या  गोकुळात 'राधा' जशी कृष्णासाठी काहीही करायला तयार असायची तसे पोलीस काही आरोपींची काहीही करायचे 'ज्ञान' नेमके कोणाकडून घेत आहेत,पोलीस अधीक्षक या साऱ्या प्रकाराला मूक संमती का देत आहेत हा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

 

Advertisement

Advertisement