Advertisement

कुंडलिक खांडेला पोलीस कोठडी

प्रजापत्र | Saturday, 29/06/2024
बातमी शेअर करा

बीड दि. २९ (प्रतिनिधी ) : आपल्याच पक्षाच्या उपजिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला केल्याच्या प्रकरणातील आरोपी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेला बीडच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तीन महिने जुन्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी पहाटे कुंडलिक खांडेला अटक केले होते. पंकजा मुंडेंचा राजकीय विश्वासघात , धनंजय मुंडेंची गाडी फोडण्याचा कट आणि मनोज जरांगे यांच्याबद्दल एकेरी वक्तव्याच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे वादग्रस्त ठरलेला शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेवर कायद्याचा फास आता आवळला जात आहे.

 

शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर तीन महिन्यापूर्वी प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आरोपी होता. मात्र सत्ताधारी पक्षाचा जिल्हाप्रमुख असल्याने असेल कदाचित, पण पोलिसांनी कुंडलिक खांडेला अटक केले नव्हते. दोन दिवसापूर्वी कुंडलिक खांडेच्या कथित ऑडिओक्लिप समोर आल्या आणि यामुळे सारेच राजकीय वातावरण ढवळून निघाले. त्या ऑडिओक्लिप च्या प्रकरणात खांडे विरुद्ध दोन गुन्हे देखील दाखल झाले आहेत. मात्र ऑडिओक्लिप प्रकरनंतर पोलीस अचानक सक्रिय झाले असून तीन महिन्यापूर्वी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या ज्ञानेश्वर खांडेंवरील प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे जामखेड येथून कुंडलिक खांडेच्या मुसक्या बांधल्या. त्याला सकाळी बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी शनिवारी दुपारी खांडेला बीडच्या न्यायालयात हजर केले. तसेच तपासासाठी सात दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली.आरोपीचे वकील बी डी कोल्हे यांनी सदर अटकच अवैध असल्याचा जोरदार दावा न्यायालयासमोर केला. मात्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दुसरे न्या. एस. टी. सहारे यांच्या न्यायालयाने खांडेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यामुळे आता कुंडलिक खांडेच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. 

 

 

 

 

 

Advertisement

Advertisement