गेवराई - ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके हे काल भगवानगडाकडे निघाले असता मराठा आंदोलक जरांगे यांच्या मातोरी गावात ओबीसी आणि मराठा समाजात वाद होवून दगडफेकीसारखी घटना घडली. त्यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असुन एक एसआरपीच्या तुकडीसह ६० पोलीस गावात तळ ठोकून आहेत. गावकर्यांच्या मते सदरची घटना ही बाहेरच्या लोकांनी येवून केली तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाने या प्रकरणी २९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असुन यामध्ये १७ जणांची नावे निष्पन्न झाले आहेत.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मातोरी या गावी रात्री अंदाधूंद दगडफेक झाली. दोन गट आमने-सामने आले. या प्रकरणाची माहिती होताच घटनास्थळावर पोलीस त्या ठिकाणी पोहंचले. ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके हे या मार्गावरून भगवानकडाकडे जात होते. त्यावेळी सदरची घटना घडली. या प्रकरणी पोलीसांनी स्वप्नील शेंबडे, नवनाथ गवते, (दोघे रा.तांदळा), अरूण खेडकर, अर्जन नेरकर, विकास खेडकर, नवनाथ खेडकर, सोनू आंधळे (सर्व रा.घाटशिळ पारगार), बप्पासाहेब माने, सचिन माने, प्रल्हाद जरांगे, अप्पासाहेब जरांगे, शिवाजी जरांगे, लक्ष्मण जरांगे, अशोक जरांगे, हनुमान घाटे, पप्पु जरांगे, आसाराम जरांगे (सर्व रा.मातोरी) व अज्ञात १० ते १२ जणांविरोधात चकलांबा पोलीसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या गावात तणावपुर्ण शांतता असुन एक एसआरपीच्या तुकडीसह ६० पोलीस तळ ठोकुन आहेत. या ठिकाणी पोलीस अधिकारी एकशिंगे, इंगळे, तांगडे हे अधिकारी गावात ठाण मांडून आहेत.